पणजी : आमदार मिकी पाशेको तुरुंगात असले तरी, येत्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकणाऱ्या विधानसभा अधिवेशनात ते उपस्थित राहू शकतील. सभापतींनी मान्यता दिली तर, पाशेको यांना अधिवेशनातील कामकाजात भाग घेता येणार आहे.वीज अभियंता मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेले आमदार पाशेको हे सध्या सडा येथील तुरुंगात आहेत. त्यांना सहा महिन्यांची कैद भोगायची आहे. तथापि, अजूनही ते विधानसभेचे सदस्य असल्याने विधानसभा अधिवेशनास ते उपस्थित राहू शकतात, अशी माहिती मिळाली. याविषयी शनिवारी सभापती राजेंद्र आर्लेकर यांना विचारले असता, ते म्हणाले की पाशेको यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले आहे याची माहिती आपल्या कार्यालयास अधिकृतरीत्या पोलीस आणि तुरुंग प्रशासनाने दिली आहे. पाशेको हे अजून विधानसभेचे सदस्य असल्याने त्यांना अधिवेशनास उपस्थित राहू नका, असे म्हणता येणार नाही. मिकी यांनी जर इच्छा व्यक्त केली तर आपल्या परवानगीने त्यांना अधिवेशनास येता येईल. अर्थात तशी वेळ अजून आलेली नाही. दरम्यान, विधानसभा अधिवेशन हे जुलैच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. अजून अधिकृतरीत्या अधिवेशन बोलावले गेलेले नाही. पुढील काही दिवसांत ते बोलावले जाऊ शकते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.पाशेको हे तुरुंगात राहाणार असल्याने त्यांना ‘ना काम, ना वेतन’ या तत्त्वानुसार वेतन दिले जाऊ नये, अशी मागणी आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली आहे. याबाबत सभापती आर्लेकर यांनी पाशेको यांचे वेतन थांबविता येत नाही, असे सांगितले. पान २ वर
जुलैच्या अधिवेशनास मिकी उपस्थित राहू शकणार
By admin | Updated: June 7, 2015 01:31 IST