- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : व्हिडीओ व्हायरल प्रकरणी सध्या अडचणीत आलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास पोलिसांनी विरोध केला असून या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबान्या अजुन नोंद करण्याच्या बाकी असल्याने पाशेको यांना जामीनमुक्त केल्यास या साक्षीदारांवर ते दबाव आणू शकतात असा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.
बेदरकार गाडी चालवून दुसऱ्याच्या जीवावर उठल्याच्या आरोपाखाली पाशेको यांच्या विरोधात वेर्णा पोलीस स्थानकात दखलपात्र गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणात अटक होण्याच्या भीतीने पाशेको यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायनोरा लाड यांच्यासमोर हा अर्ज सुनावणीस आला असता, वेर्णा पोलिसांच्यावतीने या जामीनाला विरोध करणारे लेखी निवेदन सादर करण्यात आले. आता या प्रकरणात उद्या शनिवारी युक्तीवाद होणार आहेत.
पोलिसांच्या या निवेदनात पाशेको यांच्या विरोधात यापूर्वी कोलवा व मायणा कुडतरी पोलीस स्थानकात एकूण सात फौजदारी स्वरुपाची प्रक़रणो नोंद झाली आहेत याकडे लक्ष वेधताना पाशेको हे राजकारणी असल्याने ते साक्षीदारावर दबाव आणू शकतात असे म्हटले आहे. त्याशिवाय या गुन्हय़ात आणखी तीन व्यक्तींचा समावेश आहे. या तीन व्यक्ती कोण हे फक्त पाशेको यांना माहीत आहे. या संशयितांर्पयत पोचण्यासाठी पाशेको यांना अटकेत घेऊन त्यांची चौकशी करण्याची गरज वेर्णा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पाशेको यांच्या विरोधात फॅनी डिसिल्वा या महिलेने कोलवा व वेर्णा पोलीस स्थानकावर तक्रारी नोंदविल्या आहेत. पहिल्या तक्रारीत पाशेको यांनी बेताळभाटी किनाऱ्यावर गाडी चालवून आपला मुलगा मिलरॉय डिसिल्वा याच्या वॉटरस्पोर्टस् केंद्रावरील पॅराशूटची नासधुस केल्याचा आरोप आहे तर वेर्णा पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत उतोर्डा समुद्र किना:यावर पाशेको यांनी भरधाव गाडी चालवून आपल्या मुलाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला तसेच त्याला जीवंत मारण्याची धमकी दिली असे म्हटले आहे.
पाशेको यांनी आपल्या जामीन अर्जात हे सर्व मुद्दे नाकारताना केवळ राजकीय कारणामुळे आपल्यावर ही खोटी तक्रार नोंदविल्याचा दावा केला आहे.