पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या चतुर्थ श्रेणीतील सेवेत कायम असलेल्या २८0 कर्मचाऱ्यांना काम कमी करण्याबाबत कारणे देत मेमो देण्यात आले. या प्रकाराचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून मेमो मागे घेण्यात यावा, अन्यथा सोमवारी निदर्शन व नंतर संप पुकारण्याचा इशारा कामगार नेते पुती गावकर यांनी दिला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या ३0 वर्षांपासून जास्त काळ काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना महाविद्यालयाचे संचालक सावंत यांनी गेल्या सप्टेंबरपासून विविध कारणे देत मेमो देण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर ते आॅक्टोबर काळात २८0 कामगारांना कामाचा दर्जा निष्कृष्ट असल्याची कारणे देत मेमो काढले आहेत. इस्पितळात कमी कर्मचारी असल्याने एका कर्मचाऱ्यालाच तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. गेले कित्येक दिवस सलग दोन ते तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत. अशा पद्धतीने दिवस-रात्रीची पाळी करत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने त्या इस्पितळात असल्याची माहिती पुती गावकर यांनी दिली. इस्पितळाच्या अधिकारी वर्गाने काही निवृत्त कामगारांच्या नावानेही मेमो पत्र काढले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची तपासणी न करता सरसकट काही कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून मेमो काढण्यात आले असल्याचेही गावकर म्हणाले. मेमो मागे घेण्यात यावा म्हणून सोमवारी (दि.२) सकाळी ९ वा. गोवा वैद्यकीय महाविद्यालयााच्या समोर निदर्शने केली जातील. सोमवारी यावर निर्णय घेतला गेला नाही, तर मंगळवारी एकदिवसीय संप पुकारण्यात येईल व त्याच दिवशी तीन दिवस संप पुकारण्याची नोटीस सादर केली जाईल, अशी माहिती गावकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
गोमेकॉच्या २८0 कर्मचाऱ्यांना मेमो
By admin | Updated: November 1, 2015 01:59 IST