पणजी : महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता असूच शकत नाहीत; कारण भारतीय संस्कृतीनुसार पिता तोच असू शकतो, ज्याने जन्म दिला आहे़ महात्मा गांधी यांनी देशाला जन्म दिलेला नसून गांधीच भारतमातेचे सुपुत्र आहेत़ ज्याला जन्म दिला तोच या भारतमातेचा पिता कसा होऊ शकतो, असा सवाल ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातील प्रमुख अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला़ येत्या १४ तारखेपासून मडगाव, पणजी व वास्को येथे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या बहुचर्चित नाटकाचे प्रयोग होत आहेत. त्यानिमित्त आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते़महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली, या एक मुलीने विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारने केलेल्या खुलाशाचा दाखला देत त्यांनी आपला गांधीद्वेष आधोरेखित केला़ नथुराम गोडसेने गांधीजींच्या खून करण्याच्या कृतीमागे नथुरामची काय भूमिका आहे, त्याची बाजू ऐकून घेण्यापूर्वीच व नाटक पाहण्यापूर्वीच या नाटकाला विरोध केला गेला़, असे सांगत पोंक्षे यांनी या वादग्रस्त नाटकाचे जोरदार समर्थन केले़ उच्च न्यायालयाची लढाई जिंकून या नाटकाचे ७०० प्रयोग महाराष्ट्र, गोवा व बेळगाव आदी ठिकाणी हाउसफुल झाले आहेत़ दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रयोग सुरू झाले असून ९५०वा प्रयोग गोव्यात होत आहे़ केंद्रात व महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर नव्याने प्रयोग सुरू करण्यामागील भूमिका काय, या प्रश्नावर ते म्हणाले, नाटक न्यायालयीन लढाई जिंकून आलेले आहे़ जिथे प्रयोग होईल, तेथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी संबंधित पोलीस स्थानकांची आहे,असे न्यायालयाने आम्हाला दिलेल्या निकालात नमूद केलेले आहे. त्यामुळे या नाटकाला कोणत्याही पक्षाचे सरकार विरोध करूच शकत नाही, असे पोंक्षे यांनी स्पष्ट केले़ या पत्रकार परिषदेस संयोजक गुरुनाथ नाईक, आनंद कुलकर्णी व निर्माते उदय धुरत उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
महात्मा गांधी राष्ट्रपिता असूच शकत नाहीत : शरद पोंक्षे
By admin | Updated: December 10, 2014 01:06 IST