लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मोगलाई व पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोव्यातील अनेक पुरातन मंदिरे पाडून टाकली. मात्र जुलमी सत्ताधीशांच्या तावडीतून सुटलेले प्राचीन मंदिर म्हणजेच तांबडी सुर्ला येथील महादेवाचे मंदिर. साक्षात भगवान महादेवानेच आपल्या मंदिराचे रक्षण केल्याचे लोक अजूनही बोलून दाखवतात. या मंदिराला पुरातत्त्व विभागाने खास मानांकन दिले आहे.
इथला परिसर एवढा शांत आहे की फार पूर्वी येथे साधुसंत ध्यानधारणेसाठी येत असत. आजही येथे तुम्हाला ध्यानधारणेत मग्न लोक अधेमधे आढळून येतात. या भागात चौदाव्या शतकापर्यंत कदंबाचे राज्य होते. त्या काळात या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळेच या मंदिराच्या काही बांधणीत त्यांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो.
या मंदिराच्या गर्भगृहाच्या आतील पीठावर भव्य असे शिवलिंग आहे. तिथेच एक रहस्यमय गुहा आहे, व त्या गुहेत नागराजाचे वास्तव्य आहे अशीसुद्धा आख्यायिका आहे. या मंदिराच्या वास्तुकलेचे खास वैशिष्ट्य म्हणजे उगवत्या सूर्याची पहिली किरणे या मंदिरात नेहमी प्रवेश करतात. महिषासुरमर्दिनी, सरस्वती, सुब्रमण्य, गणपती, ब्रह्मदेव, भैरव, नटराज, उमासहीत शंकर, विष्णू, शिवपार्वती मुखमंडपातील ही शिल्पे या मंदिराचे वैभव वाढवतात.
श्री महादेवाचे तांबडी सुर्ला येथील मंदिर हे आमच्या वैभवशाली पौरात्य शास्त्राचा एक नमुना आहे. जंगलवस्तीत दुर्गम अशा भागात रगाडो नदीकिनारी हे मंदिर वसलेले आहे. ह्या मंदिराबाबत अनेक तर्क-वितर्क बांधले गेलेले आहेत. हे मंदिर नेमके कोणी बांधले याचा ठोस पुरावा कुणाकडेच नसला तरी काही इतिहासकारांनी काही अंदाज मात्र बांधलेले आहेत. काहींच्या मते दैत्य हे शिवाची पूजा करत. कदाचित त्यांनीच हे मंदिर हजारो वर्षांपूर्वी बांधले असावे. काहींच्या मते वनवासात पांडवांनी ते मंदिर बांधलेले असावे. बाराव्या शतकाच्या आसपास हे मंदिर बांधले गेले असावे असे आजचे इतिहासकार म्हणतात. दगडावर दगड रचून या मंदिराची निर्मिती केलेली आहे. महाशिवरात्रीला येथे तीन दिवस मोठा उत्सव असतो.
- बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता श्रींचा महाभिषेक होणार आहे. नंतर भाविकांसाठी अभिषेक खुला होणार आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी चार वाजता प्रशांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
- पूर्वी येथे जायला वाहनांची सोय नव्हती. पायी चालण्याजोगे रस्तेसुद्धा नव्हते. आता मात्र मंदिरापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. वाहनांची सोय आहे. दररोज येथे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. इतिहास व स्थापत्यशास्त्र अभ्यासण्यासाठीसुद्धा लोक येत असतात.
- इथल्या मंदिराजवळून वाहणाऱ्या नदीला तीर्थक्षेत्र संबोधले जाते. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी येणारे काही भाविक भल्या पहाटे या नदीत अंघोळ करून नंतरच मंदिरात प्रवेश करतात. दिवसभर येथे देवाच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. देशाच्या विविध भागातील लोक येथे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच येऊन वास्तव्य करतात.