पणजी : समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचे काम दिलेल्या दोन्ही कंत्राटदारांना यापुढे पैसे फेडू नयेत, असा आदेश लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिला आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार समाजकार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे व सूरज बोरकर यांनी लोकायुक्तांकडे केली होती. आता १९ जुलै रोजी पुढील सुनावणी आहे. राम इंजिनियरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी व भूमिका क्लीन टेक प्रा. लि. कंपनी या दोन कंपन्यांकडे हे कंत्राट होते. यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पर्यटन खात्याच्या संचालकांनी त्यांचे म्हणणे मांडावे तसेच कंत्राटविषयक संबंधित फाईल सादर करावी, असे बजावले आहे. गेल्या वर्षी १८ मे रोजी आयरिश यांनी यासंबंधी दक्षता खात्याकडे केलेल्या तक्रारीस अनुसरून कोणती चौकशी केली. यासंबंधीचा अहवाल सादर करण्यास दक्षता अधिकाऱ्यांना सांगितले आहे. किनारे स्वच्छतेच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना आयरिश यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, राम इंजिनियरिंग आणि भूमिका क्लीन टेक या दोन्ही कंपन्यांचे मालक मनीष मोहता, पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत यांच्याविरुध्द भादंसंच्या कलम ४२0, १२0 (ब), १९८८च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ८, ९, १३ (१) (ड) १३ (२) सह गुन्हे नोंदविण्याची मागणी केली होती. सप्टेंबर २0१४ मध्ये हे कंत्राट देण्यात आले. उत्तर गोव्यातील किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे वार्षिक ७ कोटी ५१ लाख ४0 हजार ९९९ रुपये कामाचे कंत्राट भूमिका क्लीन टेक कंपनीला तर दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांचे काम राम इंजिनियरिंग या कंपनीला ७ कोटी ४ लाख ८७ हजार ९९९ रुपयांना दिले होते. दोन्ही कंपन्यांचे मालक मनीष मोहता हेच आहेत, असाही आयरिश यांचा दावा आहे. एरव्ही २ कोटी रुपयांमध्ये होणाऱ्या कामासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले. शास्त्रीय पध्दतीने किनाऱ्यांची सफाई केली जाईल, असे सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात या दोन्ही कंपन्यांना त्याबाबत अनुभव नाही, असे आयरिश यांचे म्हणणे आहे. किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचून राहिले. कोणतीही साफसफाई झाली नाही. किनाऱ्यांवर कचरा जाळण्यात येऊ लागला तसेच काही ठिकाणी वाळूत तो पुरला जाऊ लागला. उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रकारही सर्रास घडू लागले. हे सिध्द करण्यासाठी आयरिश यांनी जवळपास १५0 फोटोही आयुक्तांना सादर केले होते. (पान ९ वर)
लोकायुक्तांचा सरकारला दणका
By admin | Updated: July 7, 2016 02:40 IST