पणजी : अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा गोव्यातही अमलात यावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे बैठक घेण्यात आली. अंनिसचे संस्थापक आणि संयोजक श्याम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा गोव्यात व्हावा या दिशेने तर्कशुद्ध पद्धतीने विचार व ताकदीने लढा दिल्यास हा कायदा अस्तित्वात येऊ शकतो, असे सांगितले. तसेच असा कायदा जगाच्या पाठीवर कोठेही झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. अज्ञानातून केल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा कायदा गरजेचा आहे. तसेच सर्वसामान्य लोकांचे शोषण करून त्याद्वारे समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या हेतूने भोंदू लोकांनी केलेला प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा कसा ठरतो, हे या बैठकीत श्याम मानव यांनी नमूद केले. यात एक अदिनियम असा आहे की नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे, अशा अपराधासाठी दोषी व्यक्तींना शिक्षेची तरतूद आहे. जादूटोणा करणाऱ्या आणि भोंदू लोकांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रयत्न चालले आहेत. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारची अनिष्ट कृती करणे, तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करत त्याद्वारे फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे, करणी, भानामती, जारणमारण यांच्या नावाने अमानुष कृत्ये करणे, मानसिक विकलांग व्यक्तीस अमानवी व्यक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तींची लुबाडणूक करणे, मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्ती उसल्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हे सर्व बंद करण्यासाठी हे विधेयक गोव्यात येणे का आवश्यक आहे याविषयी चर्चा करण्यात आली. रमेश गावस यांनी मानव यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यज्ञेश्वर निगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा गोव्यातही हवा
By admin | Updated: June 30, 2014 02:10 IST