लोकमत न्यूज नेटवर्क, मुळगाव : देवी लईराईच्या होमकुंडाच्या जत्रेची ख्याती गोवा आणि महाराष्ट्रात आहेत. मात्र, गोवा आध्यात्मिक महोत्सवातील या 'अग्निदिव्य' कार्यक्रमातून देवीचा महिमा संपूर्ण देशभर पसरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केले. दत्त पद्मनाभ पीठ तथा सद्गुरू फाऊंडेशनतर्फे शिरगांव येथे आयोजित केलेल्या अग्निदिव्य कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पद्मनाभपीठाचे स्वामी ब्रहोशानंद, प्रयागराज येथील निरांजन आखाड्याचे भूपेंद्रगिरी महाराज, हरिद्वार येथील तपोनिष्ठ अग्निहोत्री स्वामी संपूर्णानंद ब्रह्मचारी महाराज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, ब्राह्मी देवी, खासदार सदानंद तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, देवस्थानचे अध्यक्ष गणेश गांवकर, प्रा. रामनारायण द्विवेदी, मोहम्मद खान आदी उपस्थित होते.
दरम्यान, अग्निदिव्य सोहळ्यासाठी भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात होत असलेल्या या भव्य सोहळ्यामध्ये स्थानिकांची उपस्थिती मोठी होती. त्यामुळे परिसरत भक्तीमय बनला होता. दिवसभर विविध उपक्रम आयोजित केले होते.
प्रयागराज येथील निरांजन आखाड्याचे भूपेंद्रगिरी महाराज यांनी गोव्याची दोन रूपे जगासमोर आहे, एक रात्रीच्या अंधारात हरवलेला गोवा मात्र दिवसाच्या प्रकाशात सूर्यासारखा लख्ख तेजस्वी असलेला हा खरा गोमंतक असल्याचे सांगितले. इथले आध्यात्मिक वैभव पहिले असता गोवा हे खऱ्या अर्थाने या धर्तीवरील स्वर्ग आहे, असे तपोनिष्ठ अग्निहोत्री संपूर्णानंद ब्रह्मचारी महाराज यांनी सांगितले.
धर्मजागृतीसाठी सदैव सहकार्य
धर्मजागृती व धर्म रक्षणासाठी स्वामी ब्रह्मेशानंद यांच्या अशा उपक्रमांना सरकारचे सदैव सहकार्य राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंतदिली. तर सद्गुरू ब्रह्मेशनंद म्हणाले की, गोव्याचे खरे आध्यात्मिक व धार्मिक स्वरूप जगासमोर आणण्यासाठी मार्केटिंगची गरज नाही. लईराई देवीच्या प्रसिद्धीसाठी देवीच्या धोंडगणानी पावले उचलावीत. जर कुंभमेळ्या प्रमाणे इथल्या जत्रोत्सवात परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक आले तर वेगळ्या पर्यटनाची गोव्याला गरजच नसल्याचेही ते म्हणाले.
आमदार प्रेमेंद्र शेट महोत्सवाचे आयोजक
महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारलेले मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सलग दुसऱ्या वेळेला आपल्याच मतदारसंघात अशा धार्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच गोव्याची बदलती प्रतिमा खोडून आध्यात्मिक प्रगती जगाला दाखविण्यासाठी सर्व स्तरांतून कार्य करण्याचे आवाहन केले.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आर्दीची यावेळी भाषणे झाली. गोव्याच्या कोनाकोपऱ्यांतून आलेले असंख्य भाविक आणि धोंड गण यांनी केल्या जयघोषाने अवघा परिसर दणाणून सोडला. यावेळी परिसरातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीमध्ये तल्लीन झाले होते.