पणजी : कदंब महामंडळासाठी ३00 ते ४00 कोटींचा कॉर्पस निधी उभारणार, अशी घोषणा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कदंब प्रवासाचे पास महागणार असल्याचे स्पष्ट केले. दोन वर्षांत बसगाड्यांची संख्या ८00 वर नेली जाईल, तसेच शारीरिकदृष्ट्या पात्र नसलेल्या सुमारे ७0 चालक-वाहकांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचे कठोर पाऊल सरकारला उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महामंडळाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील बसस्थानकावर आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्वेच्छा निवृत्ती देताना मानवतावादी दृष्टिकोन ठेवला जाईल. वैद्यकीय खर्चासाठी शक्य तितके सर्व लाभ त्यांना दिले जातील. ज्यांना इतर काम देणे शक्य आहे, त्यांचे काम बदलले जाईल, अशी पुस्तीही पर्रीकर यांनी जोडली. महामंडळासाठी कॉर्पस फंड उभा केला जाईल. या निधीच्या व्याजातून बऱ्याच गोष्टी करता येतील. हा निधी पुढील २0 वर्षे काढता येणार नाही, अशी कायदेशीर तरतूद केली जाईल. बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम केले जातील. राजधानी शहरातील बसस्थानकाचे काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. कर्मचाऱ्यांना वेतनाचे सर्व लाभ, तसेच थकबाकीही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कदंबच्या ताफ्यात सध्या ५२२ बसगाड्या आहेत. येत्या दोन वर्षांत ही संख्या ८00 वर नेण्याचा मनोदय असल्याचेही ते म्हणाले. पास सेवेचा फेरआढावा घेण्यात आला असून नव्या अधिसूचनेनुसार आता ३0 टक्क्यांऐवजी ४0 टक्के रक्कम बाहेर काढावी लागणार आहे. शटल सेवेचे दरही वाढणार आहेत. यामुळे प्रवाशांना फटका बसणार असला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन केले आहे. महागाई वाढली तरी तीन वर्षे तिकीटदर वाढले नव्हते, असा दावा त्यांनी केला. सध्या ४६ हजार पासधारक आहेत आणि शटल सेवेतच पास पद्धतीचा अधिकाधिक वापर होत आहे. नियमित बसगाड्यांच्या तुलनेत शटल सेवेचे दर कमी होते, असे आढळून आल्याने फेररचना करावी लागल्याचे ते म्हणाले. कदंबला सबसिडी ६0 टक्क्यांवरून वाढवून ७५ टक्के दिली जाईल, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. किलोमीटरमागे ८ रुपये तोटा : ढवळीकर तत्पूर्वी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सध्या कदंबला प्रती किलोमीटर ४५ रुपये खर्च येतो; परंतु उत्पन्न मात्र किलोमीटरमागे फक्त ३८ रुपये मिळते. प्रति किलोमीटर ८ रुपये होणारा तोटा भरून काढण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील. महिनाभरात सर्व गाड्यांना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम बसविण्यात येतील, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येतील. जीपीएस सिस्टममुळे एखाद्या बसला वाटेत अपघात झाल्यास त्वरित त्याची माहिती कंट्रोल रुमला मिळेल आणि बस निश्चितपणे कोणत्या स्थळी (पान २ वर)
कदंबचे पास महागणार
By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST