लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : गोव्यात काँग्रेसच्या नुकसानीला दिगंबर कामत हेच जबाबदार आहेत. २००७ मध्ये कामत यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने पक्षाची वाताहात केली. त्यांच्यापूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर कधीच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता. मात्र, जेव्हा दिगंबर कामत मुख्यमंत्री झाले, त्यानंतर भ्रष्टाचाराचे पेव फुटले. त्यांना मुख्यमंत्री करणे हीच काँग्रेसची सर्वांत मोठी चूक ठरली, अशी कबुली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
चोडणकर काल, मंगळवारी दाबोळी विमानतळावरून पंजाबला रवाना झाले. जालंदर-पंजाब लोकसभा निवडणुकीत पक्षाने गिरीश यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कामतांवर गंभीर आरोप केले. २००५ मध्ये दिगंबर कामत काँग्रेसमध्ये आल्यानंतर २००७ मध्ये त्यांना पक्षाने मुख्यमंत्री बनवले. त्यावेळी सुभाष शिरोडकर काँग्रेसचे अध्यक्ष होते व ते पक्ष शक्तीशाली बनवण्यासाठी पावले उचलण्याचे प्रयत्न करायचे. तर, मुख्यमंत्री असलेले कामत पक्षाला संपवण्यासाठी काम करू लागले होतो, असेही चोडणकर म्हणाले.
कामतांच्या हट्टामुळे सरकार बनले नाही!
कामत यांच्या पक्षविरोधी धोरणांमुळेच २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या आमदारांची संख्या ९ वर आली. २०१७ मध्ये सत्ताधाऱ्यांवरील रोष रोषामुळे काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले. मात्र, त्यावेळी कामत यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरल्यामुळे आमचे सरकार बनू शकले नाही, असा दावाही चोडणकर यांनी केला.
...अन् भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले
जेव्हा मी अध्यक्ष बनलो तेव्हासुद्धा पक्ष शक्तीशाली बनवण्यास दिगंबर कामत यांनी कधीच मदत केली नाही. मैत्रीच्या नावाखाली ते सतत भाजपच्याच संपर्कात होते. कामत यांच्यापूर्वी जे काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते, मात्र कामत येताच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली, असा आरोपही चोडणकर यांनी केला.