पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक मंगळवारी होऊन ७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. एकूण ४७४ कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पांमधून येणार असून ९२२ नोकऱ्या निर्माण होणार आहेत. दोन फार्मास्युटिकल कंपन्यांचा यात समावेश आहे. तुये, वेर्णा, धारगळ व शिरोडा येथे ४ उद्योग येतील, तर कुठ्ठाळी येथे हॉटेल येणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उद्योगमंत्री महादेव नाईक, मंडळावरील सदस्य तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, मंडळाकडे अनेक प्रस्ताव होते; परंतु ज्या प्रकल्पांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मान्यता आहेत, त्याच प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. याआधी मंजूर केलेले प्रकल्प उभे राहत आहेत. पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्योग आणि ५0 हजार नोकऱ्यांचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. याआधीच्या बैठकीत ४६ प्रकल्प मंजूर करण्यात आले. त्यातून ८८00 नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या उद्योगांमध्ये ८0 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांनाच मिळाल्या पाहिजेत, यासाठी सरकार आग्रही आहे. प्रदूषण न करणारे उद्योग राज्यात यावेत यासाठी प्राधान्य आहे. दरम्यान, शिरोडा औद्योगिक वसाहतीसाठी १ लाख ५ हजार चौरस मीटर भूसंपादन करण्यात आले असून तेथे १५ लघुउद्योग येणार आहेत. (प्रतिनिधी)
४७४ कोटींची गुंतवणूक ; ९२२ नोकऱ्या
By admin | Updated: October 7, 2015 01:43 IST