मडगाव : मडगावातील दोन ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखान्यांत गुरांच्या चरबीचा तुपासाठी वापर केला जातो, ही गोष्ट उघड झाली असताना राय-सांतेमळ येथेही एका घरात अशाच प्रकारे बेकायदेशीर कत्तलखाना चालू होता, ही गोष्ट उघड झाली असून या घरातही गायीच्या चरबीने भरलेले डबे सापडल्याने येथेही या चरबीचा तूप बनविण्यासाठी वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात गोग्यान फाउंडेशनने मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे. या कत्तलखान्यातून दोन बैल, दोन पाडसे, दोन म्हशी व एक रेडा यांना अॅनिमल रेस्क्यूचे अमृतसिंग यांच्या साहाय्याने मुक्त केले आहे. यापैकी काही गुरे सुर्ल येथील एका शेतकऱ्याची असून ती चोरून आणली असावी, असा संशय अमृतसिंग याने व्यक्त केला आहे. राय-सांतेमळ येथील ए. एस. बेपारी याच्या घरातच हा बेकायदेशीर कत्तलखाना चालू होता, अशी माहिती सिंग यांनी दिली. या घरातच गुरे मारली जात होती. या ठिकाणी दोन कढया सापडल्या असून दोन डब्यांत गुरांची चरबी झाकून ठेवल्याचे दिसून आले आहे. बाजूच्या एका खोलीत चरबीने भरलेले डबे साठवून ठेवलेले असावेत, असा संशय सिंग यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची वर्दी मायणा-कुडतरी पोलिसांना देताच पोलीस उपनिरीक्षक देवू माणगावकर घटनास्थळी दाखल झाले. या कत्तलखान्याचा मूळ मालक गायब झाला असून पोलीस आले तेव्हा घरात एक वृद्ध व्यक्ती सापडली. या संदर्भात रात्री उशिरा तक्रार दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी पशुवैद्यकाच्या उपस्थितीत घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला जाईल, अशी माहिती मायणा-कुडतरीचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी दिली. दरम्यान, गोव्यात कित्येक ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कत्तलखाने चालू असून अशा कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास गोवा सरकार फारसे उत्सुक नाही, असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृत सिंग यांनी केला. (प्रतिनिधी)
राय-सांतेमळ येथेही बेकायदा कत्तलखाना
By admin | Updated: June 29, 2014 02:03 IST