सद्गुरू पाटील-पणजी : स्पेशल ज्युरी आणि सेंटेनरी असे दोन पुरस्कार मिळवत ‘एक हजाराची नोट’ या मराठी चित्रपटाने येथे ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मराठीचा झेंडा फडकविला. ‘लिविआथन’ या रशियन चित्रपटास सुवर्ण मयूर प्राप्त झाला. लिविआथन हा या वेळच्या इफ्फीतील सर्वाेत्कृष्ट चित्रपट ठरला. अकरा दिवसांच्या इफ्फीचा रविवारी दिमाखात समारोप झाला. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात समारोप सोहळा पार पडला. श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ चित्रपटास स्पेशल ज्युरी आणि सेंटेनरी हे दोन्ही पुरस्कार जाहीर केले तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. इफ्फीत एखाद्या मराठी चित्रपटाला एवढा मोठा बहुमान अलीकडील काळात प्रथमच प्राप्त झाला. साठे यांनी स्पेशल ज्युरी पुरस्कार गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक आणि दिव्या दत्ता यांच्या हस्ते स्वीकारला. सेंटेनरी पुरस्कार त्यांना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मल्याळम अभिनेता जयराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामीण महाराष्ट्रातील एका महिलेला आमदाराकडून निवडणूक काळात एक हजाराची नोट मिळते. या पैशांतून विविध स्वप्ने साकार होणार असल्याच्या आनंदात ती असतानाच शहरामध्ये तिच्या वाट्याला कसे अनुभव येतात, यावर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. शोषकाकडून शोषितांची केली जाणारी स्थिती चित्रपटातून अधोरेखित होते. अभिनेत्री वहिदा रेहमान आणि राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते ‘लिविआथन’ चित्रपटाचे दिग्दर्शक अँड्री यांनी सुवर्ण मयूर स्वीकारला. चाळीस लाख रुपये व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरुण चित्रपट निर्र्माते व दिग्दर्शक वाँग कार वाय यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. नामवंत निर्माते रमेश सिप्पी व राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘या पुरस्काराबाबत खूप अभिमान व आश्चर्यही वाटतेय; कारण आपल्याला हा पुरस्कार लवकर मिळाला. आपण निवृत्तीकडे पोहचलेलो नाही. आपण या पुरस्काराचे श्रेय पत्नीला देतो,’ असे वाँग कार वाय म्हणाले. उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार एलिना रॉड्रिग्ज व सरित लरी या दोघांना विभागून देण्यात आला. ‘बिहेवियर’ या सिनेमातील भूमिकेसाठी एलिना रॉड्रिग्ज हिला हा पुरस्कार मिळाला. सरित लरी हिला ‘द किंडरगार्टन टिचर’ चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार लरी व रॉड्रिग्ज या दोघींना प्रदान करण्यात आला. ‘लिविआथन’ चित्रपटातील भूमिकेसाठी अलेक्सेल सेरेब्रियाकोव यास उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार दोन अभिनेत्यांना विभागून देण्यात आला. ‘छोटोदेर छबी’ या बंगाली चित्रपटातील दुलाल सरकार यांनाही उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्राप्त झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड व जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या दोघांनी हा पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार ‘किंडरगार्टन टिचर’ सिनेमाचे दिग्दर्शक नदाव लापिड यांना प्रदान करण्यात आला. गोव्याचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव व राजेश्वरी सचदेव यांच्या हस्ते लापिड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री पार्सेकर यांचे समारोप सोहळ्यावेळी भाषण झाले. गोमंतकीयांचा सहभाग इफ्फीत वाढतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे. यंदा तेरा हजार प्रतिनिधींची इफ्फीत नोंद झाली. यापुढेही गोमंतकीयांचा सहभाग इफ्फीत वाढत जावा, जेणेकरून आम्हाला साधनसुविधांमध्येही सुधारणा करता येईल. गोवा हे आम्हाला सांस्कृतिक केंद्रही बनवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनीही विचार मांडले. चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन राजकुमार राव आणि रिचा चड्ढा यांनी केले.
इफ्फीत फडकला मराठीचा झेंडा
By admin | Updated: December 1, 2014 02:12 IST