पणजी : केंद्रात असलो तरी पणजीसाठी मी कायम अतिरिक्त आमदार म्हणूनच कार्यरत असेन. पणजीवासियांनी पाचवेळा निवडून आणताना जी माया दिली त्याची परतफेड करणे शक्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे केले. येथील महालक्ष्मी मंदिराजवळ आयोजित भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पणजीत कोणतीही विकासकामे केली नाहीत, हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना त्यांनी कामांची यादीच सादर केली. पणजीला नवा पाटो पूल दिला आणि विशेष म्हणजे गुंडगिरी बंद केल्याचे ते म्हणाले. हिरा पेट्रोलपंपच्या मागे असलेली जमिनीवर मोठे बांधकाम येणार होते. काँग्रेसच्या एका माजी मुख्यमंत्र्याने त्यासाठी खटाटोप चालविला होता. आपण तो हाणून पाडला. काही महिन्यात या जागेत कचरा प्रकल्प येईल. सांतइनेज नाल्याची साफसफाई आणि सौंदर्यीकरणाच्या कामासाठी साधनसुविधा विकास महामंडळाकडे निधी देण्यात आलेला आहे. निवडणुकीनंतर निविदा काढल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ३९ वर्षांचा असताना आपण पणजीतून निवडणूक लढवली आणि आमदार बनलो. आज सिध्दार्थही ३९ वर्षांचाच आहे, या तरुण रक्ताला निवडून विधानसभेत पाठवा, असे कळकळीचे आवाहन पर्रीकर यांनी केले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, भाजप नेहमीच पणजीवासियांच्या ऋणात राहील; कारण पणजीने पक्षाला पहिला आमदार दिला. पर्रीकरांनी मुख्यमंत्री असताना पणजीतील शाळांना बांबोळी येथे जागा दिली. रस्ते बांधले, आता मांडवीवर तिसरा पूल येत आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही कुंकळ्येकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, वनमंत्री एलिना साल्ढाना, खासदार नरेंद्र सावईकर, भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर आदींची या वेळी भाषणे झाली. व्यासपीठावर उद्योगमंत्री महादेव नाईक, आमदार प्रमोद सावंत, ग्लेन तिकलो, राजन नाईक, नीलेश काब्राल तसेच पणजी महापालिकेतील भाजप नगरसेवक व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पणजीसाठी मी कायम अतिरिक्त आमदार
By admin | Updated: February 11, 2015 02:02 IST