पणजी : खाणी सरकारनेच ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. खनिज संपत्तीचा अधिकाधिक स्थानिक वापर व्हावा, असेही ते म्हणाले. जागतिक शांतता परिषदेसाठी येचुरी येथे आले होते. भारताने इस्रायलकडून शस्त्रास्त्र खरेदी करू नये, असे आवाहन करून ते म्हणाले की, शस्त्रास्त्र व्यवहारातून मिळणारा पैसा इस्रायलकडून पॅलेस्टिनींवर अत्याचारांसाठी वापरला जातो. पॅलेस्टिनींवरील हल्ले थांबले पाहिजेत. नव्यानेच संरक्षणमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर यांनी इस्रायलशी शस्त्रास्त्र व्यवहार थांबविण्याबाबत गंभीरपणे विचार करावा. या पक्षाचे अन्य एक पॉलिट ब्युरो सदस्य नीलोत्पल बसू यांनी इस्रायलशी लष्करी व्यवहार करणाऱ्या देशांना सर्व गोष्टी कळून चुकल्या आहेत, असा दावा केला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेली आश्वासने पाळत नाहीत. मोदी सरकारची स्थिती संपुआसारखीच आहे. भाजपच्या राज्यात अच्छे दिन नाहीच, अशी टीका येचुरी यांनी केली. ‘वर्ल्ड पीस कौन्सिल आणि आॅल इंडिया पीस अॅण्ड सॉलिडॅरिटी आॅर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे शातंता परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत चार महत्त्वाचे ठराव करण्यात आले. केंद्रात भाजप सरकार त्यांना निवडणुकीत ज्या बड्या उद्योगांनी मदत केली त्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या प्रचार मोहिमेवर १५,000 कोटी खर्च करण्यात आले. इतके पैसे आणले कुठून, असा सवाल येचुरी यांनी केला. पुढील वर्षी प्रजासत्ताकदिनाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. मोदी सरकार आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका करताना भाजपकडून जातीयतेवर लोकांचे ध्रुवीकरण करण्याचे काम चालू आहे, असा आरोप येचुरी यांनी केला. लोकचळवळीतून याला विरोध झाला पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
खाणी सरकारनेच चालवाव्यात : येचुरी
By admin | Updated: December 1, 2014 02:11 IST