वासुदेव पागी ल्ल पणजी जैका प्रकल्पात लुईस बर्जर इंटरनॅशनल कन्सल्टन्सीकडून माजी मंत्र्यांना दिलेली लाच ही खुद्द शासकीय बंगल्यातच दिली होती तर दुसऱ्या मंत्र्याला ती घरपोच केली होती, अशा निष्कर्षापर्यंत तपास पोहोचला आहे. या प्रकरणात तिघा अधिकाऱ्यांचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे नोंदविलेले महत्त्वाचे जवाब तर्कसुसंगत आहेत. त्यावरून अनेक बाबींची स्पष्टता होते. विशेष सूत्रांनी ही माहिती दिली. जैकाचे दोन माजी अधिकारी तसेच शहा कन्सल्टन्सीचे माजी अधिकारी यांनी फौजदारी दंडसंहिता कलम १६४ खाली नोंदविलेल्या जबाबात एक तर्कसुसंगतता असल्याची माहिती पणजी सत्र न्यायालयात क्राईम ब्रँचतर्फे दिली होती. जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ही माहिती न्यायालयाला सादर केली होती. विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या माजी मंत्र्याला कोठे लाच दिली आणि ती केव्हा, याची सविस्तर माहिती या तीन साक्षीदारांकडून क्राईम ब्रँचला दिली आहे. एका माजी मंत्र्याला मडगाव येथे त्याच्या निवासस्थानीच लाच दिली तर दुसऱ्याला पणजीत त्यांच्या शासकीय बंगल्यात दिली होती. पैसे हे सानू नामक व्यक्तीतर्फे दिले आणि दोन्ही माजी मंत्र्यांना लाच देताना आनंद वाचासुंदर उपस्थित होते. या प्रकरणातील तपासकामाने वेग घेतला आहे. येत्या काही दिवसांत क्राईम ब्रँचकडून धक्कादायक कारवाईची शक्यताही आहे. या प्रकरणात सामील दोन्ही माजी मंत्र्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याचे लुईस बर्जर कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांनी जबाबात म्हटले होते. त्यामुळे या दोन्ही माजी मंत्र्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शासकीय बंगल्यात लाच
By admin | Updated: August 3, 2015 01:55 IST