पणजी : व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी सोमवारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी गोमेकॉत १00 जागांसाठीच प्रवेश देण्यात आलेला आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून वाढीव ५0 जागांसाठी परवानगी अजून अधिकृत लेखी स्वरूपात यायची आहे. दुसरीकडे शिरोडा येथील रायेश्वर इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीच्या १८0 जागा गोवा विद्यापीठाने रोखल्याने त्याही भरता आलेल्या नाहीत. तांत्रिकी शिक्षण उपसंचालक प्रदीप कुस्नूर यांनी ही माहिती दिली. गोमेकॉत १00 जागांसाठीच प्रवेश देण्यात आलेला आहे. वाढीव ५0 जागांसाठी मेडिकल कौन्सिलकडून अजून आवश्यक ती परवानगी यायची आहे. ती आल्यानंतर उर्वरित ५0 जागा भरल्या जातील.रायेश्वर इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीच्या जागांसाठी प्रवेश देऊ नये, असे निर्देश तांत्रिकी शिक्षण संचालनालयाला दिलेले आहेत. संस्थेने काही बाबींची आवश्यक ती पूर्तता केल्यानंतरच त्या भरल्या जातील. अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंत, फार्मसी आणि आर्किटेक्चर आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली असून सर्व जागा भरलेल्या आहेत.अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी मेकॅनिकल, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आदी मिळून वेगवेगळ्या व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये एकूण १३00 जागा आहेत. सांतइनेज येथील सरकारी आणि फोंड्यातील पीईएस या दोन फार्मसी महाविद्यालयांमध्ये १२0 जागा आहेत. या जागाही भरलेल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनियरिंगला सर्वाधिक मागणी आहे. गेल्या वर्षी आयटीच्या काही जागा रिक्त राहिल्या होत्या. जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञानची मागणी घटल्याने तसेच नोकऱ्याही घटल्याने गेल्या वर्षी आयटीकडे विद्यार्थी फिरकले नव्हते; परंतु या वर्षी चित्र बदलले आहे. राज्यात खाणी बंद असल्याने बी.ई. इन मायनिंग या अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. (प्रतिनिधी)
गोमेकॉत १00 जागांसाठीच प्रवेश
By admin | Updated: June 23, 2015 01:18 IST