लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने ३० मे ही घटक राज्यदिनाची नवीन डेडलाइन निश्चित केली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथे सोमवारी आयोजित 'उल्हास मेळा २०२५' न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी १९ डिसेंबर २०२४ पर्यंत राज्य शंभर टक्के साक्षर करण्याचे लक्ष्य होते. परंतु ९४ टक्केच साक्षरता झालेली आहे. उर्वरित ६ टक्के येत्या मेअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.
साक्षरता प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहाजणांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. राज्यातील नगरपालिका आणि पंचायत या दोन्ही स्तरांवर साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निरक्षर व्यक्तींना शोधतात आणि त्यांना मूलभूत साक्षरतेचे धडे देण्यासाठी नंतर वर्ग आयोजित केले जातात. गोव्यात राहणाऱ्या परप्रांतीय निरक्षरांनाही या साक्षरता उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते.
कार्यक्रमास शिक्षण सचिव प्रसाद लोलयेंकर, नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगांवकर, शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.
...तर गोवा पहिले राज्य
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचा शोध घेऊन त्यांना साक्षरतेचे धडे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. निरक्षर लोक साक्षर झाले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी एससीईआरटीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. वाचन, लेखन आणि मूलभूत अंकांची कौशल्ये आत्मसात केली आहेत, याची खात्री केली जाते. येत्या ३० मेपर्यंत शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणारे गोवा हे पहिले राज्य असेल.