पणजी : गोव्यात ५५ व्या इफ्फीचा पडदा आज बुधवारी उघडला. दोनापॉल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, इफ्फीने गोव्याला जागतिक सिनेमाच्या व्यासपीठावर नेले. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी २००३ साली इफ्फी गोव्यात आणला आणि गेली २० वर्षे गोव्यात यशस्वीरित्या आयोजन होत आहे. गोवा आणि इफ्फी आता एकरूप झाला आहे.'
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कलाविष्कारांचे सादरीकरण यावेळी झाले. उद्घाटनानंतर ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता मायकल ग्रेसी यांच्या 'बेटर मॅन' या चित्रपटाने इफ्फीचा प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवसांच्या काळात एकूण २७० हून अधिक चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत. तर ॲास्ट्रेलियन निर्माता फिलिप नॉईस याला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले आणि अफलातून चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. १९ जागतिक आणि आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, ४३ आशियाई प्रीमियर्स आणि १०९ भारतीय प्रीमियर्स या इफ्फीत होतील.
सिने जगताशी संबंधित देश, विदेशीतील सुमारे ६,५०० हजार प्रतिनिधींनी यंदा इफ्फीसाठी नोंदणी केली आहे. सिने कलाकार, तंत्रज्ञ यांची मोठी उपस्थिती पुढील दहा दिवसांच्या काळात इफ्फीला लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, थरारक नृत्याविष्कारांचा समावेश असलेला ‘डान्स एक्स्प्लोजन’ मध्ये बॉलिवुडमध्ये एकेकाळी गाजलेल्या चित्रपटांमधील जुन्या गाण्यांच्या आठवणी जाग्या केल्या.
दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपला व्हिडिओ संदेश पाठवला. प्रत्येक भारतीय निर्माते जागतिक कथाकार बनतील याची खात्री करूया. उद्याच्या कथांसाठी जग भारताकडे पाहत आहे. गुवाहाटी, कोची आणि इंदोरसारखी शहरे सर्जनशील केंद्रे म्हणून उदयास येत आहेत.', असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्व अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांनी सूत्रनिवेदन केले.