लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राष्ट्रीय महामार्गासह गोव्याच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. देशाच्या विविध भागांशी दळणवळणाची साधने विकसित झाली आहेत. देशातील सर्वात स्वस्त वीज गोव्यात दिली जाते. या व अशा मार्गाने राज्य प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर असल्याचे मत गोव्याचे ऊर्जा व गृहनिर्माणमंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ढवळीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यसभेचे माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांची 'यवतमाळ हाऊस' या त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जीएमआरचे डेप्युटी सीईओ मिलिंद पैदरकर उपस्थित होते.
गोव्याच्या विकासाविषयी यावेळी डॉ. दर्डा यांच्याशी चर्चा करताना अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाममंत्री व उपमुख्यमंत्री राहिलेले सुदिन ढवळीकर म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून आता गोवा मुंबई व कोकणाच्या अधिक जवळ आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात राज्याच्या खेड्यापाड्यात हॉट मिक्स रस्त्याचे चांगले जाळे तयार झाले आहे. कोणत्याही कोपऱ्यातून पंधरा-वीस किलोमीटर अंतर कापले की महामार्गावर जाता येते. गोव्याच्या पर्यटनविकासाला रस्तेविकासाची मोठी मदत झाली आहे. याशिवाय, नव्या विमानतळासह देशाच्या दूरवरच्या भागाशी संपर्कही सुलभ झाला आहे.
गोवा राज्य स्वतः मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन करीत नसले तरी नागरिकांना सर्वात स्वस्त वीज देणारे राज्य आहे. घरगुती ग्राहकांना अडीच रूपये युनिट दराने, तर उद्योगांना उच्च्चदाबाची वीज आठ-नऊ रूपये युनिट दराने मिळते. यामुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळाली असून नागरिकांमध्येही सरकारप्रती समाधानाची भावना आहे, असे पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जाखाते सांभाळणारे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
पुनरुज्जीवनासाठी मगोप प्रयत्नशील
मुक्तीसंग्राम व त्याहीआधी महाराष्ट्राचे गोव्याशी ऋणानुबंध आहेत. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर व शशिकलाताई काकोडकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्राने गोव्याला सातत्याने बळ दिले. आजही गोव्याला महाराष्ट्राचा आधार वाटतो. असा आठवणींना उजाळा देताना मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, गोव्याच्या जनतेचे अजूनही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावर प्रेम कायम आहे. ते वृद्धिंगत करतानाच पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.