जीसीए घोटाळा : डीसीबीच्या व्यवस्थापिकेची चौकशी करण्याची मागणीमडगाव : गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) 2.87 कोटींच्या कथित घोटाळाप्रकरणी अटकेतील खजिनदार अकबर मुल्ला यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या घोटाळ्यात आपल्याला विनाकारण अडकविले, असा दावा करतानाच हा घोटाळा करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याची माहिती डीसीबी बँकेच्या माजी व्यवस्थापिका ललिता काकोडकर यांना आहे. त्यांची चौकशी करण्यास पोलीस हयगय करतात, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात बँकेकडून जे धनादेश वटविले त्यापैकी एकाही धनादेशावर आपली सही नसल्याचा दावा त्यांनी केला.जीसीएच्या या घोटाळ्य़ात यापूर्वी मुल्ला यांच्यासह अध्यक्ष चेतन देसाई व सरचिटणीस विनोद ऊर्फ बाळू फडके या तिघांना अटक झाली होती. सध्या तिघेही जण जामिनावर मुक्त आहेत. यासंबंधी मुल्ला यांनी गुरुवारी मडगावात पत्रकार परिषद घेतली. तीत ते म्हणाले, या घोटाळ्यामागे जीसीएच्याच कोणाचातरी हात आहे. डीसीबी बँकेत पैशांचे व्यवहार कोणी केले, याची माहिती बँक व्यवस्थापिका आणि रोखपालाला (कॅशियर) असणार. या व्यवस्थापिकेविरोधात आपण पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे आता गरज पडल्यास यासाठी न्यायालयात धाव घेऊ.ते म्हणाले, ज्या वेळी हा कथित घोटाळा झाला, त्या वेळी आपण फक्त जीसीएचा स्वीकृत सदस्य होतो. जीसीएचे सर्व व्यवहार सरचिटणीसाच्या अधिकारात होतात. बीसीसीआयकडून आलेला 2.87 कोटींचा धनादेश सरचिटणीसाकडेच कायद्याने येऊ शकतो आणि त्या वेळी संघटनेचे सरचिटणीस चेतन देसाई होते आणि अध्यक्ष दयानंद नार्वेकर होते.ते म्हणाले, इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी आपण आपला पासपोर्ट जीसीए कार्यालयात जमा केला होता. याच पासपोर्टचा दुरुपयोग करून हे बनावट खाते खोलले गेले. आपल्या पासपोर्टवर नाव मुल्ला अगबोर अली असे असतानाही जे खाते उघडले गेले आहे, त्यावर अकबर ए. मुल्ला असे नाव असून त्यावर केलेली सहीही आपल्या सहीशी जुळत नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासमोर हस्तक्षेप याचिका दाखल केलेले हेमंत आंगले यांनीही आपल्या याचिकेत त्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हे खाते उघडताना जीसीएचे फोन क्रमांक दिले आहेत तेही बनावट आहेत. हे करताना बँकेने जीसीएच्या फोन बिलाचीही पडताळणी केली नाही. एवढेच नव्हे तर दहा व पंधरा लाखांची रक्कम त्या व्यक्तीचे केवळ पहिले नाव नमूद करून काढली गेली आहे. केवळ एकेरी नावावर बँकेने एवढी मोठी रक्कम कशी दिली? वास्तविक कोणत्याही बँक व्यवहारात खजिनदाराची सही अनिवार्य असते. मात्र, डीसीबीच्या या खात्यातून 47 वेळा धनादेश वटविले आहेत. या एकाही धनादेशावर आपली सही नाही. हे सर्व पाहता बँक अधिकारीही या घोटाळ्यात सामील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची गरज मुल्ला यांनी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले
जीसीए घोटाळा - अकबर मुल्ला यांचा खजिनदारपदाचा राजीनामा
By admin | Updated: July 7, 2016 20:32 IST