बार्देस : ई-मेलद्वारे मोठ्या कंपन्यात नोकऱ्या देण्याचे मॅसेज पाठवून बँकेत सुमारे दीड लाख जमा करण्यास भाग पाडून आपली फसवणूक केल्याची तक्रार देवेंद्र दाभोळकर यांनी नोंदवली आहे. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकर याला काही रक्कम भरली तर आपणाला मोठ्या कंपनीत नोकरी दिली जाईल, असे ई-मेल येत होते. खातरजमेसाठी दोन वेगवेगळ्या वेबसाईटची नावे दिली जात होती. नोकरीची गरज असल्याने दाभोळकर यांनी गेल्या वर्षभरापासून ते सांगतील तसे पैसे भरले. आतापर्यंत त्यांनी १ लाख ५० हजार रुपये भरले असता नोकरीची माहिती दिली जात नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यानंतर त्यांनी बुधवारी पोलीस स्थानकात आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक यांनी तक्रार नोंद करून घेतली असून पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
नोकरी देण्याच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक
By admin | Updated: November 26, 2015 01:36 IST