गोव्यात साक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. विविध आघाड्यांवर गोव्याची प्रगती सुरू आहे; पण या प्रदेशात ठकसेनांची संख्याही वाढली आहे. नोकरीकांड घडले, त्यात पस्तीस ते चाळीस ठकसेनांची माळ गोमंतकीयांना पाहायला मिळाली. अर्थात ही माळ अजून मोठी असेलही, पण सरकारला सध्या हे कांड नकोसे झाले आहे. त्यामुळे पोलिसही तपास काम जास्त पुढे नेणार नाहीत. कारण फास सरकारच्या गळ्याभोवती येऊ शकतो, याची कल्पना सर्वांनाच आली आहे. आता येथे विषय नोकरीकांडाचा नाही तर सायबर गुन्ह्यांचा आहे. परवाच पोलिस महासंचालक आलोककुमार यांनी मीडियाला माहिती दिली, ती अशी की- सायबर गुन्हेगारांनी गेल्या दहा महिन्यांत गोमंतकीयांना नऊ कोटींचा गंडा घातला आहे.
वास्तविक सायबर गुन्हेगारांना जेरीस आणण्यासाठी गोव्याची पोलिस यंत्रणा निश्चितच वावरत आहे, पण तरीही सायबर गुन्हेगारीचे बळी ठरणारे गोमंतकीय संख्येने कमी नाहीत. जागृती खूप होत आहे; पण लोकांची फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी लोक धडा घेत नाहीत. सहज फसविले जातात, नागवले जातात. नोकरी विकत घेण्यासाठी लोक सहज पैसे काढून ठकसेनांना देतात, तसेच जादा व्याज देतो असे कुणी सांगितले की लोक सहजच कष्टाचे पैसे कुठेही गुंतवून मोकळे होतात. यामुळेच वित्तीय संस्था अनेक गोमंतकीयांना गंडा घालत आहे. कुणी १३० कोटी रुपयांना टोपी घालतो, मग आपले मुख्यमंत्री जाहीर करतात की फातोर्डा ते लंडन असा घोटाळा झालाय आणि हा गोव्यातला सर्वांत मोठा घोटाळा आहे.
अर्थात परवा मुख्यमंत्र्यांनी तसे जाहीर करण्यामागे वेगळा हेतू होता. विरोधक नोकरीकांड पेटवू लागल्याने गोंयकारांचे लक्ष वेगळीकडे नेण्याच्या हेतूने ते विधान केले गेले होते; मात्र तसे असले तरी, काहीजणांनी गुंतवणुकीच्या नावाखाली गोमंतकीयांना टोपी घातली ही वस्तुस्थिती कायम राहतेच. गोव्यात अनेक वित्तीय कंपन्या किंवा अन्य कंपन्या स्थापन होऊन गोंयकारांना लुटत आहेत. काहींना राजकारण्यांचा आशीर्वाद असतो.
गोव्यात जमिनी हडप करण्याचे प्रकारही मध्यंतरी उघडकीस आले. सर्व प्रकारचे गुन्हे या छोट्या राज्यात अलीकडे मोठ्या संख्येने उघड होत आहेत. जमिनी हडप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एक चौकशी आयोग नेमून मध्यंतरी तपास काम करून घेतले. गोव्याच्या किनारी भागांत जमिनींचा भाव प्रचंड वाढलाय. त्यामुळे तिथे जमीन बळकाव प्रकरणे अधिक आहेत. पर्वरीपासून कांदोळी-कळंगुट-बागाच्या पट्ट्यात तसेच पेडणे तालुक्यातील किनारी भागातील जमिनींवर अनेकांचा डोळा आहे. यात काही राजकारणीही आहेतच. जमीन हडप प्रकरणी यापूर्वी अनेकांना अटक झाली आहे, पण हे गुन्हे थांबलेत काय ? कागदपत्रांमध्ये फेरफार करून दुसऱ्याच्या जमिनी लाटणाऱ्यांना काही सरकारी अधिकारीही मदत करतात. त्यामुळेच असे गुन्हे घडतात.
आता पुन्हा नोकरी विक्रीकांडाकडे येऊ. आठ-दहा महिलांना यापूर्वी अटक झाली. या महिलांनी पूर्वी ज्या लोकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या, त्यांना अशा नोकऱ्या देणे सहज शक्य झाले काय ? काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व काही राजकारण्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. मध्यंतरी मुख्यमंत्रीच जाहीरपणे बोलले होते की काही अधिकाऱ्यांचीही नोकरी प्रकरणी चौकशी केली जाईल. कुठे झाली चौकशी ? कितीजण सेवेतून निलंबित झाले? अनेकदा यात गरिबांचा जीव जातो. नोकरीकांड उघड होताच प्रियोळ मतदारसंघातील एकाने आत्महत्या केली. पोलिस त्या प्रकरणाच्या मुळाशी गेले काय? गोव्याची सामाजिक स्थिती विचित्र व भयानक झालेली आहे. विविध प्रकरणे एकमेकात गुंतली गेली आहेत. खून प्रकरणेही वाढत आहेत.
पैसा, मालमत्ता बळकविण्यासाठीही खून केले जात आहेत. गेल्या अकरा महिन्यांत राज्यात सात महिलांचे खून झाले आहेत. केपे येथील महिलेच्या खुनाचा छडा काल लागला. अलीकडची जास्त गंभीर गोष्ट म्हणजे अनेक फसवणूक प्रकरणांमध्ये महिला आरोपी म्हणून पुढे येत आहेत. कुडचडेतील एका बँकेतील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांमधून परस्पर बरेच पैसे काढले गेले. तन्वी वस्त या महिलेनेच हे कर्म केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिला अटकही झाली. अनेक प्रकरणांमध्ये महिला पकडल्या जात आहेत. ठकसेनांची संख्या झपाट्याने वाढतेय, हे चिंताजनक आहे.