पणजी : गोव्यातील आम आदमी पक्षासाठी मी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आहे, अशा प्रकारची चर्चा अनेकदा होत असली, तरी मी प्रत्यक्षात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे डॉ. आॅस्कर रिबेलो यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. वाल्मीकी नायक, सुरेल तिळवे, अॅश्ली रोझारिओ या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत बोलताना रिबेलो म्हणाले की, माझ्या व्यावसायिक व कौटुंबिक अशा काही जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मला निवडणूक लढवायची नाही. आपण रिंगणात नसलो, तरी आम आदमी पक्षासोबत असेन. ‘आप’चे जे उमेदवार निवडून येतील व जे आमदार होतील, त्या आमदारांमधूनच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडला जाईल. बाहेरील कुणा व्यक्तीची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली जाणार नाही, असे डॉ. रिबेलो म्हणाले. काँग्रेस व भाजपचे काही आमदार सध्या म.गो. पक्षात जाऊ पाहत आहेत, अशी चर्चा आहे. तसेच काही आमदार व पक्ष मिळून युती करू पाहत असल्याचीही चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात गोव्यात निधर्मी किंवा जातीयवादी शक्तींची युती होत नाही, तर काही धंदेवाईक आमदार एकत्र येतात हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे रिबेलो म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याच मतदारसंघात पाण्याची तीव्र समस्या आहे व ते गोव्याला चोवीस तास पाणी पुरविण्याच्या बाता मारत आहेत, अशी टीका अॅड. सुरेल तिळवे यांनी केली. (खास प्रतिनिधी)
गोष्टी सांगेन चार युक्तीच्या..!
By admin | Updated: September 28, 2016 01:57 IST