बार्देस : म्हापसा येथील श्री हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या एस. एस. ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाच्या शटरची कुलपे अज्ञात चोरट्यांनी तोडून ४ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दुकानमालकाने म्हापसा पोलिसांत दिली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरची ट्युबलाईट फोडून प्रथम अंधार केला व नंतर शटरची कुलपे तोडली. ती तोडल्यावर शटर वर केले आणि आतील दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील सोन्याचे तोडे, हार, सोनसाखळी तसेच चांदीच्या समई व इतर सोन्या-चांदीच्या वस्तू मिळून ४ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. दुकानाच्या मालक शर्मिला आरसेकर यांचे पती सतीश आरसेकर हे सोमवारी सकाळी ७.३० वाजता दुकानात आले असता, चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जितीन पोतदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व तपास केला. दरम्यान, केणीवाडा-म्हापसा येथील रवळनाथ शिरोडकर यांच्या बंद घराच्या पुढील दाराचे कुलूप तोडून रविवारी रात्री चोरट्यांनी ७०० रुपये व देवपूजेच्या वस्तू चोरून नेल्या. तसेच कपाट उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कपाट न उघडल्याने इतर वस्तू त्यांच्या हाती लागल्या नाहीत. शिरोडकर कुटुंबीय देवदर्शनासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथे गेले होते. सोमवारी सकाळी ७.१५ वाजता ते घरी आले असता, घराचे पुढील दार उघडे असल्याचे त्यांना दिसले. चोरट्यांनी प्रथम पुढील गेटचे कुलूप तोडले. नंतर दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. (प्रतिनिधी)
चार लाखांचे दागिने म्हापशातून लंपास
By admin | Updated: December 2, 2014 00:57 IST