पणजी : पणजीतील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या तिकिटाकरिता चारजणांनी अर्ज केले आहेत. महापौर सुरेंद्र फुर्तादो हे यात ‘फ्रंट रनर’ असल्याचे मानले जाते. फुर्तादो यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस आर्थुर सिक्वेरा, माहिला आयोगाच्या माजी अध्यक्षा एजिल्दा सापेको तसेच डॉम्निक सावियो यांनीही तिकिटासाठी अर्ज केला आहे. काँग्रेस प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चारही अर्ज पक्षाच्या प्रदेश समितीकडे छाननीसाठी जातील. त्यानंतर नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली जातील आणि या समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर उमेदवाराचे नाव जाहीर हाईल. या सर्व सोपस्कारांसाठी दहा ते पंधरा दिवस लागतील. मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर त्यांनी पणजीच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ही जागा रिक्त झालेली असली तरी अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेकजण इच्छुक आहेत, अशी चर्चा गेले काही दिवस होती. मध्यंतरी यतिन पारेख यांचेही नाव घेतले जात होते. प्रत्यक्षात चारच अर्ज आलेले आहेत. तिकिटासाठी अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवार ९ रोजी सायं. ४ वाजेपर्यंत होती. या मुदतीत चारच अर्ज आले. दरम्यान, ‘फ्रंट रनर’ असलेले फुर्तादो यांनी तिकीट आपल्यालाच मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे. आपण महापौर असून गेली २५ वर्षे राजकारणात आहे. सामाजिक कार्यातही आपला सहभाग राहिलेला आहे. या आधी येथील आमदाराने जनतेला आश्वासने दिली; परंतु ती पूर्ण होऊ शकलेली नाहीत. पणजीतील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. जनतेने एकदा आपल्याला संधी द्यावी, असे फुर्तादो यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
पणजीत काँग्रेसकडून चार इच्छुक
By admin | Updated: December 10, 2014 01:06 IST