पणजी : सरकारचे नाक दाबले की तोंड सहज उघडते याचा प्रत्यय घेतलेल्या ‘फोर्स’ संघटनेने आता इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळांना सरकारचे अनुदान मिळावे यासाठी मोर्चा, उपोषणाचे हत्यार उपसले आहे. विधानसभा अधिवेशनाचा मुहूर्त साधून विधानभवनावर २७ रोजी मोर्चा काढण्याचा ठराव संघटनेच्या आमसभेत घेण्यात आला, तर संघटनेचे सचिव सावियो लोपिश याच दिवसापासून पणजीत बेमुदत उपोषणास प्रारंभ करणार आहेत. त्यांना पाठिंबा देत काही पालकही साखळी उपोषण करतील. येथील चर्च हॉलमध्ये संघटनेच्या गुरुवारच्या आमसभेनंतर ‘लोकमत’ला लोपिश यांनी सांगितले की, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांवरील अन्याय आणखी खपवून घेतला जाणार नाही. कामत सरकारच्या काळात माध्यमप्रश्नी मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुकूल निर्णय झाला, त्याचे कायद्यात रूपांतर व्हायला हवे. त्यासाठी विधानसभेत विधेयक आणणे आवश्यक आहे. ही मागणी धसास लागेपर्यंत आंदोलन चालूच ठेवू. आर्च डायोसेझनच्या शाळांसह या मागणीला १८0 शाळांचा पाठिंबा आहे. ‘फोर्स’ने बुधवारी दक्षिणेतील पालकांची आमसभा घेतली. त्यानंतर गुरुवारी उत्तरेतील पालकांची आमसभा झाली. सुमारे ८00 पालकांची उपस्थिती होती, असा दावा लोपिश यांनी केला. आर्च डायोसेझनच्या १२0 प्राथमिक शाळांना सरकारकडून सध्या अनुदान मिळत आहे. इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना ते दिले जावे, अशी मागणी आहे. आमसभेत व्यवस्थापनांच्या वतीने फा. वेतोरिन डिसोझा यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)
‘फोर्स’चा पुन्हा जोर
By admin | Updated: July 17, 2015 03:44 IST