ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३ - बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचा (गोमेकॉ) व्याप वाढत आहे; पण हे इस्पितळ सांभाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही लवकर मिळत नाही आणि सरकार पुरेसा निधीही देत नाही. शिवाय साडेपाचशेपैकी सुमारे दीडशे परिचारिका सीसीएल घेऊन रजेवर असतात. यामुळे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा वैतागले आहेत.
शनिवारी 'लोकमत'शी बोलताना डिसोझा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, गोमेकॉचा व्याप वाढला, तरी प्रशासनाचा विस्तार झाला नाही. आपण मनुष्यबळ घेऊन प्रशासनाचा विस्तार करू पाहतोय; पण पर्सनल खाते तसेच प्रशासकीय सुधारणा खाते नवे मनुष्यबळ घेण्यास मान्यता देत नाही आणि अर्थ खाते आपल्याला गोमेकॉसाठी व आरोग्य खात्यासाठी वाढीव निधीही देत नाही.
डिसोझा म्हणाले की, डीन व अधीक्षकांना गोमेकॉ सांभाळत नाही. कारण गोमेकॉवरील बोजा वाढला आहे. गोमेकॉमध्ये अनेक महिला डॉक्टर्स आहेत व परिचारिका आहेत. त्यांना सीसीएल रजा द्यावी लागते. त्याबाबत माझी तक्रार नाही; पण त्यांनी रजा घेतल्यानंतर रजा काळात पर्यायी नियुक्ती करण्यास पर्सनल व एआरडी खात्याने मान्यता द्यायला हवी, ती दिलीच जात नाही. सार्वजनिक बांधकाम खाते गोमेकॉला कमी प्रमाणात पाणी पुरवतेय. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होते. गोमेकॉत रुग्ण संख्या वाढली, तरी पाणी व विजेचे प्रमाण वाढलेले नाही.
डिसोझा म्हणाले की, आपल्या खात्याने नुकतेच ३४ वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले. गेली दोन वर्षे आपण या भरतीबाबत पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले. आपल्याला वारंवार अर्थ, पर्सनल व एआरडी या खात्यांशी संघर्ष करावा लागतो. आता आयुष खात्यातर्फे २२ आयुर्वेदिक व १९ होमियोपथी डॉक्टर आम्ही निवडणार आहोत. गोमेकॉसह अन्य सरकारी इस्पितळांतील अनेक डॉक्टरांना आपण वेतनही वाढवून देऊ शकत नाही. केवळ ३0 हजार रुपयांच्या वेतनावर काहीजणांना नियुक्त करावे लागते. आरोग्य क्षेत्रासाठी जास्त निधीची गरज आहे. कार्डिओथेरोसिस विभागातील डॉक्टरांना गेली दोन वर्षे पगारवाढ मिळालेली नाही. (खास प्रतिनिधी) समिती नियुक्त
गोमेकॉतील गोंधळ दूर करण्यासाठी तेथील त्रुटी शोधून काढण्यासाठी आपण डॉ. अविनाश कामत धाकणकर यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे. त्यांना महिन्याभरात अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल आल्यानंतर सुधारणांसाठी आपण पुढील पावले उचलीन, असे डिसोझा यांनी सांगितले.