मडगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची कन्या वांंदा आलेमाव हिच्या विरोधात दुहेरी नागरिक प्रतिबंध कायद्याखाली दोन आठवड्यांच्या आत एफआयआर नोंद करा, असा आदेश मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बॉस्को रॉबर्ट्स यांनी दिला असून मागचे नऊ महिने या प्रकरणात एफआयआर नोंदविला नसल्यामुळे कोलवा पोलिसांवर ताशेरेही ओढले आहेत. वांंदा आलेमाव हिच्या जन्माची नोंदणी पोर्तुगालामध्ये केली असून तिने दुहेरी नागरिकत्व स्वीकारल्याचा दावा करून काशिनाथ शेटये आणि अन्य दोघांनी २४ मार्च रोजी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, कोलवा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंद न केल्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या १५४ कलमाखाली प्रथम वर्ग न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात कोलवाचे निरीक्षक व दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना प्रतिवादी बनविले होते. शेटये यांची मागणी उचलून धरताना न्या. बॉस्को यांनी कुठल्याही व्यक्तीने गुन्हा केल्याचे पोलिसांच्या लक्षात आणून दिले तर त्या व्यक्तीवर एफआयआर दाखल करणे पोलिसांवर बंधनकारक असते. काही अपवादात्मक प्रसंगीच पोलीस प्राथमिक चौकशी करून एफआयआर नोंदवू शकतात, याकडे लक्ष वेधले. या प्रकरणात वांंदा आलेमाव यांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे तक्रारदारांनी कोलवा पोलिसांच्या लक्षात आणून देऊनही ९ महिने या तक्रारीवर पोलिसांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी अर्जदाराने न्यायालयात दावा दाखल केला असता ५ मे २०१४ रोजी कोलवा पोलिसांनी यासंबंधी सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. मात्र, हा अहवालही न्यायालयात सादर केला गेला नाही याकडे या आदेशात लक्ष वेधले आहे. या प्रकरणात पोलिसांची बाजू मांडताना अॅड. जी.डी. कीर्तनी यांनी भारतीय नागरिक कायद्याच्या काही कलमांखाली निर्णय घेण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारच्या संबंधित अधिकारिणीला असल्याचा दावा केला होता. (प्रतिनिधी)
वांदा आलेमाववर एफआयआर दाखल करा
By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST