पणजी : आरोग्याला अपायकारक व बोगस ब्रँडची उत्पादने विकण्याच्या प्रकरणात गोवा विद्यापीठातील कॅण्टिनचालकाला अन्न व औषध प्रशासनाने दंड केला होता; परंतु त्याच्यावर विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे येथील कॅण्टिनमधील कारभारावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. विद्यापीठाच्या कॅण्टिनवर अन्न व औषध प्रशासनाने २६ फेब्रुवारी २०१५ रोजी छापा टाकला होता. या छाप्यात कॅण्टिनमध्ये रॉयल कॉर्न फ्लोरचे बोगस ब्रँड लाऊन पदार्थ विकले जात असल्याचे आढळून आले होते. प्रशासनाचे निरीक्षक शैलेश शेणवी यांनी ही कारवाई केली होती. तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या नॅशनल फुड प्रॉडक्ट्स मुंबई या कंपनीला आपल्या उत्पादनावर बोगस ब्रँड वापरण्यासाठी २५ हजार रुपये दंड ठोठावला होता. तसेच कॅण्टिनचे कंत्राटदार जॉन मिनेझिस यांना १० हजार रुपये दंड केला होता. आजही हेच कंत्राटदार विद्यापीठाचे कॅण्टिन चालवित असून त्यांना केवळ इशारा देऊन सोडण्यात आले आहे. याविषयी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. पी. कामत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या घटनेनंतर कंत्राटदाराला योग्य समज देण्यात आली होती. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी काही खबरदारी घेण्यासही सांगितले होते आणि कडक इशाराही दिला होता. विद्यापीठाकडून केवळ समज देऊन मोकळे सोडण्यात आल्यामुळे कंत्राटदाराचे फावले आहे; कारण विद्यापीठाचे कॅण्टिन हे नेहमीच वादात राहिले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या ज्येष्ठ प्राध्यापकांवरही या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्याची वेळ आली आहे. डॉ. नंदकुमार कामत यांनी याच मुद्द्यावर कॅण्टिनमध्ये सतत तीन दिवस प्रतिकात्मक आंदोलन केले होते. एका कारवाईवर थांबून अन्न व औषध प्रशासनाने त्यानंतर दुसऱ्यांदा या कॅण्टिनकडे लक्ष दिलेले नाही. एकदा छापा टाकून गेल्यानंतर पुन्हा दुसरा छापा लवकर होत नाही, हे गृहीत धरूनच कॅण्टिनचा कारभार चालल्याचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
एफडीएने दंडित केलेल्या कंत्राटदाराला अभय
By admin | Updated: April 1, 2015 01:54 IST