सूरज पवार - मडगाव : मडगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत सध्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची हवा खाणारा फैक मुश्ताक अहमद करंबेळकर (३५) हा मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधील चेहरा आहे. सायन-कोळीवाडा भागात त्याची गँग असून मुंबई पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत त्याच्या मित्राला अटक केल्यानंतर फैकने महानगरी मुंबईतून पळ काढला होता. दरमहा खर्चासाठी त्याच्या खात्यावर जी रक्कम जमा होत होती, ती या काळ्या जगतातून येत होती. पोलीस तपासात या गोष्टी उघड झालेल्या आहेत. फैकच्या अटकेची क्राईम ब्रँचनेही दखल घेतली असून या विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी मडगावात येऊन या संशयिताची चौकशी केली. पुढील तपासासाठी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी रात्री मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयबी पोलीस पथकाने कालकोंडा येथून फैकला ताब्यात घेतले होते. या वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सापडली होती. आपल्या ताब्यात आलेली ही व्यक्ती निर्ढावलेला गुन्हेगार आहे, याची या वेळी पोलिसांना सुतरामही कल्पना आली नव्हती. सुरुवातीला फैकनेही पोलिसांना दाद न देता, स्वत:विषयी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर पोलिसी खाक्यासमोर तो वरमला व एकेक सत्य पुढे आले.
फैक करंबेळकर मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगतातील चेहरा
By admin | Updated: January 11, 2015 02:00 IST