बार्देस : म्हापसा नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या तीन नगरसेवकांनी म्हापसा विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे पालिकेतील विरोधी गट जवळजवळ संपुष्टात आला आहे. प्रभाग १ मधून निवडून आलेले नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांच्यासह अल्पा भाईडकर, मॅगी अल्फान्सो याही नगरसेवकांनी आघाडीलाच पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मधुमिता नार्वेकर या एकच विरोधी गटात राहिल्या आहेत. आता आघाडीतील नगरसेवकांची संख्या १९ वर पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांची भेट घेऊन आपण आपला पाठिंबा विकास आघाडीला देत असल्याचे बेनकर यांनी सांगितले. प्रभाग १ चा विकास व प्रभागामधील जनतेपर्यंत सरकारच्या सर्व योजना पोहोचविण्यासाठी व जनतेच्या हितार्थ आपण हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजप पुरस्कृत म्हापसा विकास आघाडीतर्फे निवडण्यात येणाऱ्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना आपला पूर्ण पाठिंबा असेल. तसेच पुढील पालिका मंडळाच्या बैठकीला पूर्ण सहकार्य असेल, असे ते म्हणाले. म्हापसा पालिकेच्या एकूण नगरसेवकांची संख्या २० आहे. (प्रतिनिधी)
म्हापशात विरोधी गट संपुष्टात
By admin | Updated: October 30, 2015 02:23 IST