पणजी : काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग सोमवारी (दि.२३) गोव्यात दाखल होत असून मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील मांडवी हॉटेलमध्ये पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेतील. आमदारांशीही चर्चा करून त्यांची मते ते जाणून घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. गट स्तरावर पक्षाचे काम कसे काय चालले आहे, याचा आढावा दिग्विजय घेणार आहेत. आपण याआधी गट पदाधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल घेतलेला आहे. दिग्विजय हे कर्नाटक दौऱ्यावर येणार असून तेथून पुढे येतील, असे फालेरो म्हणाले. राज्यात विधानसभा निवडणुका जेमतेम वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे काँग्रेसची ही पूर्वतयारी मानली जाते. आमदारांशी ‘वन टू वन’ चर्चा करून त्यांची मतेही दिग्विजय जाणून घेणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी समविचारी घटकांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा प्रस्ताव लुईझिन यांनी अलीकडेच मडगाव येथे पक्षाच्या जाहीर सभेत ठेवला होता. अपक्ष आमदारांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर काँग्रेस पुढे कोणती दिशा घेणार हे या बैठकीतील चर्चेतून स्पष्ट होणार आहे. असे असले तरी नुकत्याच इंदिराजींच्या जयंतीदिनी कार्यक्रमात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘एकला चलो रे’चे संकेत दिलेले आहेत. (प्रतिनिधी)
दिग्विजय सिंग उद्या घेणार कार्यकारिणीची बैठक
By admin | Updated: November 23, 2015 02:24 IST