लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'सरकार खाप्रेश्वराचे नव्या जागेत मंदिर बांधून देईल. वटवृक्षाचे स्थलांतर होईल त्या ठिकाणी मंदिर उभे राहील,' अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, रविवारी सायंकाळी दिली. तत्पूर्वी दिवसभर पर्वरीत मोठा तणाव निर्माण झाला. सायंकाळी मूर्ती हलविण्याचा प्रयत्न झाला असता पोलिस व भाविक भिडले. पोलिसांना शिव्या दिल्याच्या आरोपावरून एका ग्रामस्थाला ताब्यात घेतल्याने वातावरण आणखी चिघळले व तणावाची स्थिती निर्माण झाली.
रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून वटवृक्षाच्या फांद्या छाटून हे झाड स्थलांतरित करण्याचे काम ठेकेदाराने सुरू केले. त्याला आक्षेप घेत भाविक जमू लागले होते. त्यापाठोपाठ तेथील मंदिराचे पाडकाम सुरू झाल्यानंतर भाविक संतप्त झाले. या घडामोडींमुळे दिवसभर पर्वरीत तणावाचे वातावरण होते. पणजी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम चालू असून, या कामात अडसर ठरलेला वटवृक्ष कापण्यासाठी काल सकाळीच कंत्राटदार कामगारांना घेऊन आला होता. स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत त्याला रोखले. दिवसभर प्रचंड तणाव होता. वृक्षाच्या फांद्या तोडल्यानंतर लगेच मंदिरातील मूर्ती हटविण्याचे काम सुरू झाले. त्याला प्रचंड विरोध आणि गदारोळ झाला. अखेरीस रात्री साडेसातच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला काम थांबविण्याचे आदेश दिले.
आदेश कुठे आहे दाखवा?
उच्च न्यायालयाने केवळ वडाचे झाड स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. मंदिराचा विषय वेगळा असून, त्याच्या स्थलांतराबद्दल कोणताही निर्णय झालेला नसताना सकाळी कंत्राटदाराने देवस्थानच्या भागालाही हात घातल्यामुळे तणाव निर्माण झाला. खाप्रेश्वर हा देव गावचा राखणदार म्हणून ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पर्वरीचा राखणदार हटविण्यास सुरुवात झाल्याने स्थानिक हवालदिल झालेत. देवस्थान समितीने याला विरोध केला. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, नागरिक जमले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विरोधी पक्षाच्या नेत्यांचे टीकास्त्र
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी मंदिराजवळ येऊन सुरू असलेल्या कारवाईबाबत काही सवाल उपस्थित केले. विरोधी पक्षाच्या या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. पाटकर यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या अनुपस्थितीविषयी प्रश्न उपस्थित केला. येथील मंदिर हटविण्याचे कायदेशीर आदेश आहेत का? मंदिरातील श्री खाप्रेश्वर देवाची मूर्ती कोठे स्थलांतरित करणार आहे? असा सवाल त्यांनी केला.
न्यायालयाचे आदेश
गेल्या महिन्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने वडाच्या झाडाबाबतची याचिका निकालात काढताना उड्डाणपुलाच्या कामासाठी या झाडाचे स्थलांतर करण्यास संमती दर्शविली होती. वटवृक्षाच्या स्थलांतरासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. येथील श्री देव खाप्रेश्वर स्थळ देवता असून, या वडाच्या स्थलांतराला आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान सरकारने वडाच्या स्थलांतरासाठी तज्ज्ञांच्या शिफारशी आणि उपाययोजना सादर केल्या होत्या. त्या न्यायालयाने मान्य करून स्थलांतरासाठी परवानगी दिली आहे.
हिंदू धर्म धोक्यात : अमित पाटकर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच स्थानिकांनी संयुक्त मामलेदारांकडे हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पाटकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'मूर्ती हलविण्याचा कोणताही आदेश नसताना ती हलवली जात आहे. गोव्यात भाजप सरकारच्या राजवटीत हिंदू धर्म सुरक्षित राहिलेला नाही. मूर्ती हलवून ती कुठे नेणार हेही सांगितले जात नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोललो असून घुमटी पाडू देणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.'
पोलिसावर कारवाई करा
कारवाई सुरू असताना एका नागरिकाने शिवीगाळ केल्याचा आक्षेप घेत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा घटनास्थळी आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी संयुक्त मामलेदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या घटनेवेळी पोलिसानेही शिवीगाळ केली आहे. त्याच्यावरही कारवाई करा, असा आग्रह त्यांनी धरला. यावेळी मोठा गोंधळ उडाला.
मामलेदारांना घेरले
कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी आलेल्या संयुक्त मामलेदारांना संतप्त लोकांनी घेरले. पोलिसांनीही आम्हाला शिव्या दिल्या आहेत. त्यांनाही अटक करून निलंबित करा, अशी मागणी लोक करू लागले. हायकोर्टाचा आदेश केवळ वटवृक्षाचे स्थलांतर करण्यापुरता आहे. मूर्तीला हात लावू देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली व मूर्ती हलविण्यास मज्जाव केला.
जिथे वटवृक्ष, तिथेच मंदिर
राज्य सरकार खाप्रेश्वराचे नव्या जागेत मंदिर बांधून देईल. वटवृक्षाचे स्थलांतर होईल, त्या ठिकाणी मंदिर उभारले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. रविवारी रात्री सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निर्देश आल्यानंतर काम थांबविण्यात आले. दरम्यान, आज मूर्ती हलविण्यात येणार आहे.
अनेकांना अश्रू अनावर
स्थानिक नागरिकांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मंदिर हटविण्याची घाई का ? अशी विचारणा केली. वडाच्या झाडाच्या फांद्या मशीनद्वारे तोडल्या जात असताना अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले. अनेक भाविकांनी पर्वरीचा राखणदारच इथून स्थलांतर होईल असे सांगत तीव्र भावना व्यक्त केल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी वटवृक्ष हटविण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन सरकारवर जोरदार टीका केली. आता हिंदूत्ववादी संघटना कुठे आहेत? अशा शब्दात पाटकर यांनी सवाल उपस्थित केला. सरकार लोकभावनेशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.