मडगाव : नाकेरी-बेतूल येथील पठारावर येऊ घातलेल्या डिफेन्स एक्स्पोला स्थानिकांकडून विरोध होत असतानाच काँग्रेसने हा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेण्याचे ठरवले आहे़ लोकसभेत आम्ही या विषयावर आवाज उठवू, असे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी सांगितले़ मंगळवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या एक्स्पोला विरोध करण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी बेतुलात निदर्शने करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले़ या प्रदर्शनाला विरोध करणाऱ्या ‘वरिष्ठ प्रजेचो आवाज’ या संघटनेसह काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आंदोलनातील आपली पुढील भूमिका स्पष्ट केली़ गरज पडल्यास या प्रदर्शनाच्या आयोजनाला न्यायालयात आव्हान देण्याचा पर्यायही आम्ही खुला ठेवला आहे, असे ‘वरिष्ठ प्रजेचो आवाज’च्या अध्यक्ष फ्रेडी फर्नांडिस यांनी सांगितले़ या पत्रकार परिषदेला केपेचे आमदार बाबू कवळेकर, अविनाश तावारिस तसेच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई हे उपस्थित होते़ या एक्स्पोचे कुठलेही काम आम्ही करू देणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले़ काँग्रेसने आपला पूर्ण पाठिंबा बेतुलवासीयांना दिला आहे़ २८ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता होणाऱ्या निदर्शनात गोव्यातील विविध भागातील कार्यकर्ते भाग घेतील़ या एक्स्पोच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना तुरूंगात डांबले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला आहे़ हा इशारा म्हणजे निव्वळ हुकूमशाही असल्याचा आरोप त्यांनी केला़ या वेळी केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. बेतूल पठारावरील ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केली होती़ या जमिनीचा वापर त्याचसाठी करणे गरजेचे आहे़ त्या जागेवर हे नको असलेले प्रदर्शन का, असा सवाल त्यांनी केला़ प्रदर्शनाला स्थानिक शेवटपर्यंत विरोध करतील़ यापूर्वी या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सैन्यदलाच्या गाड्यांना स्थानिकांनी हाकलून लावले होते़ यापुढे अशा कामासाठी कुणी आल्यास त्याला प्रवेश दिला जाणार नाही, असे फ्रे डी फर्नांडिस यांनी सांगितले़ या पठारावर कुठल्याही पर्यटकाला घेऊन येऊ नये, असे आवाहन आम्ही टॅक्सीवाल्यांना केले आहे, असेही फर्नांडिस यांनी सांगितले़ दरम्यान, हा डिफे न्स एक्स्पो म्हणजे जमीन हडप करण्याचा केंद्राचा डाव असून हा डाव हाणून पाडण्यासाठी स्थानिकांबरोबर इतर गोमंतकीयही आंदोलनात भाग घेतील, असे फे डरेशन आॅफ रेन्बो वॉरिअर्स यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
‘डिफे न्स एक्स्पो’ मुद्दा संसदेत नेणार
By admin | Updated: February 24, 2016 02:39 IST