पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंच म्हणजे राजकीय पक्ष नव्हे, त्यामुळे मंचकडून स्वत: विधानसभा निवडणूक लढविली जाणार नाही; पण भाभासुमंचे धोरण मान्य करणाऱ्या उमेदवारांना विविध मतदारसंघांमध्ये पाठिंबा दिला जाईल. विरोधकांचा पराभव घडवून आणणे व मंचच्या धोरणाशी सहमत अशा अधिकाधिक व्यक्तींना विधानसभेत पाठवणे हे आमचे ध्येय आहे, असे मंचतर्फे बुधवारी स्पष्ट करण्यात आले. मंचने आपल्या आंदोलनाची धार वाढविण्याचे ठरविले असून यापुढे मातृभाषा रक्षक नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाद्वारे राज्यातील २ लाख देशीभाषाप्रेमींशी संपर्क साधून मातृभाषा रक्षणाची प्रतिज्ञा त्यांना घेण्यास सांगितले जाईल, असेही येथे जाहीर करण्यात आले. प्रा. सुभाष वेलिंगकर, अॅड. उदय भेंब्रे, सुभाष देसाई, पुंडलिक नाईक, अरविंद भाटीकर, पांडुरंग नाडकर्णी, महेश म्हांब्रे, वल्लभ केळकर आदींची संयुक्त पत्रकार परिषद झाली. तीत वेलिंगकर यांनी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर केला. भाभासुमंचे कार्यकर्ते आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालत आहेत.
विरोधकांचा पराभव करणार
By admin | Updated: July 7, 2016 02:32 IST