पणजी : कदंब महामंडळाच्या क्रेनचालकाने बेजबाबदारपणे क्रेन चालवून एका पादचाऱ्याला क्रेनखाली चिरडले. त्याचा इस्पितळात उपचार चालू असताना मृत्यू झाला. महामंडळाची क्रेन ही मांडवी पुलावरून मडगावच्या दिशेने जात होती. अत्यंत बेजबाबदारपणे क्रेन चालवत चालक रफिक खान याने पुढे जाणाऱ्या मारुती इंडिका कारला धडक दिली. तसेच बाजूला पार्क करून ठेवलेल्या स्कूटरलाही धक्का देऊन तिलाही चिरडले. त्यानंतर बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्यावर त्याने क्रेन घातली. क्रेनची ठोकर बसून पादचारी अनिल कुमार नाथन मेहतो (४५, औरंगाबाद) हा इसम गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या या पादचाऱ्याला लगेच गोमेकॉत दाखल करण्यात आले; परंतु अतिरक्तस्रावामुळे आणि गंभीर जखमी झाल्याने त्याने उपचाराला दाद दिली नाही. त्याचे इस्पितळातच निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. वाहन अत्यंत बेजबाबदारपणे चालवणारा चालक रफिक खान याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम २७९, ३०४ अंतर्गत बेजबाबदारपणे वागून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
क्रेनखाली चिरडलेल्या जखमीचा मृत्यू
By admin | Updated: October 18, 2015 02:45 IST