पणजी : महिला पत्रकारांच्या लैंगिक छळप्रकरणी म्हापशातील कनिष्ठ न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही फरार असलेला बदनाम पत्रकार रूपेश सामंत याच्या शोधार्थ सीआयडी गुन्हा शाखेने उपअधीक्षक नीळू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले असून रूपेशविरुध्द अजामीनपात्र वॉरंट काढावे यासाठी येथील विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. तर दुसरीकडे रूपेश याने आता अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. रूपेशच्या शोधार्थ स्थापन केलेल्या पथकात येथील महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक सुदीक्षा नाईक, निरीक्षक वीरेंद्र वेळुस्कर व उपनिरीक्षक लक्षी आमोणकर यांचा समावेश आहे. रूपेशच्या विरुध्द सहा तक्रारी आल्या असून पैकी चार प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महिला पत्रकारांशी कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणे, अश्लील चाळे करणे तसेच लैंगिक संबंधांची मागणी करणे, असे आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणांमध्ये येथील महिला पोलीस स्थानकात त्याच्याविरुध्द भादंसंच्या कलम ३५४ (विनयभंग) आणि ३५४ (अ) (लैंगिक छळ) गुन्हे नोंदविले गेले आहेत. सहापैकी एक तक्रार पूरक म्हणून चौकशीसाठी घेतली आहे तर अन्य एका तक्रारीची चौकशी चालू आहे. लैंगिक अत्याचाराबाबत रूपेशविरुध्द तक्रारींची संख्या वाढतच आहे. (प्रतिनिधी)
अजामीनपात्र वॉरंटसाठी क्राईम ब्रँच कोर्टात
By admin | Updated: October 24, 2015 02:57 IST