पणजी : केवळ सार्वजनिक बांधकाम खाते किंवा वाहतूक खात्यातच भ्रष्टाचार चालतो, असे नाही, तर वन, लेखा, गृह, पर्यटन अशा प्रत्येक खात्यांत भ्रष्टाचार सुरू आहे, अशा शब्दांत मगो पक्षाचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रथमच तोफ डागली. ‘बांधकाम खात्यात पर्सेंटेजचे प्रकार चालतात. अभियंते पर्सेंटेज घेतात,’ असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकतेच म्हटले होते. पत्रकारांनी त्या विषयी मंत्री ढवळीकर यांना सोमवारी विचारले असता, ते म्हणाले की, बांधकाम खात्यातील दहा-पंधरा टक्के अभियंते पर्सेंटेज घेतात, हे खरे आहे. पंधरा-वीस टक्के अभियंत्यांनी स्वत:च्याच कंपन्या स्थापन केल्या असून ते स्वत: या कंपन्यांमार्फत बांधकाम खात्याच्या कामांच्या निविदा घेत आहेत. हे प्रकार बंद व्हायला हवे. आम्ही कडक भूमिका घेतली असून अलीकडे भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाईही सुरू केली आहे. एखादा दोष किंवा गंभीर चूक आढळून आली की, मी लगेच त्याविरुद्ध पावले उचलतो. साळावली धरणातील गढूळ पाण्याबाबत तेथील कार्यकारी अभियंते परांजपे मला नीट माहिती देऊ शकले नाहीत. त्यांची त्वरित बदली करण्याचा आदेश मी सोमवारीच दिला आहे. मध्यंतरी पाऊस पडल्याने साळावली धरणात मॅँगनीजचे प्रमाण वाढले व त्यामुळे पाणी अधिक गढूळ झाले. (खास प्रतिनिधी)
सगळ्याच खात्यांत भ्रष्टाचार!
By admin | Updated: July 1, 2014 01:42 IST