मडगाव : मडगाव पालिकेच्या कामगारांनी पुकारलेला संप आमदार विजय सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर गुरुवारी दुपारी मागे घेण्यात आला. असे जरी असले तरी गुरुवारी सायंकाळी सफाई कामगार कामावरच न आल्याने शहरातील साचून असलेला कचरा तसाच राहिला. गांधी मार्केट, एसजीपीडीए मार्केट, आके व बोर्डा या भागात कचऱ्याच्या राशी तशाच पडून राहिल्या होत्या. संप मागे घेऊनही कामगारांनी काम न केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. आमदार सरदेसाई यांनी मध्यस्थी केल्याने पालिकेचे सफाई निरीक्षक विराज आराबेकर तसेच एनजीओचे प्रतिनिधी यांनी परस्परविरोधी तक्रारी मागे घेण्याच ठरवल्याने संपावर तोडगा निघाला. पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांनी मडगाव पालिकेत येऊन या समझोत्याची माहिती कामगारांना दिल्यानंतर कामगार नेते अनिल शिरोडकर यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू तसेच मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा व इतर नगरसेवक उपस्थित होते. या वेळी सरदेसाई म्हणाले, प्रत्येक सफाई कामगाराच्या सुरक्षेची हमी घेणे हे पालिका तसेच पोलिसांचे कर्तव्य आहे. यापुढे कामगारांना आवश्यक ती सुविधा दिली जाईल आणि गरज पडल्यास कामगारांच्या हक्कांसाठी स्वत:ही रस्त्यावर उतरेन. केवळ एका कोलव्यात राहाणाऱ्या महिलेने तक्रार केली म्हणून संपूर्ण मडगावकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. स्वत:ला सिव्हिल सोसायटीचे सदस्य म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वत: सिव्हिक सेन्स बाळगणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. या वेळी संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी सांगितले, पालिका कामगारांचा मडगावकरांना वेठीस धरण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, कर्मचाऱ्यांवर जो अन्याय झाला आणि सहा दिवस उलटूनही पोलीस त्यावर काहीच कारवाई करत नाहीत हे दिसून आल्यानंतर आम्हाला निरुपायाने संपाचे शस्त्र उगारावे लागले. (प्रतिनिधी)े
मडगाव पालिका कर्मचाऱ्यांचा संप माग
By admin | Updated: July 17, 2015 03:47 IST