पणजी : मूळ गोमंतकीय असलेले फादर जुझे वाझ यांना येत्या १४ जानेवारी २०१५ रोजी कोलंबो-श्रीलंका येथे संतपद दिले जाणार आहे. त्यासाठी फार मोठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोलंबोला जाऊ पाहणाऱ्या कमाल पाचशे गोमंतकीयांच्या खर्चाचा पन्नास टक्के भार सरकार उचलणार आहे. त्यासाठी प्रिलग्रीमेज योजनेत सरकारने दुरुस्ती केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली. अनेक गोमंतकीयांची कोलंबोला जाऊन हा सोहळा पाहण्याची इच्छा आहे. आर्थिक स्थितीमुळे जाणे परवडत नाही, असे अनेकजण आहेत. सरकारने त्यासाठी थोडी मदत करावी, अशा प्रकारच्या विनंत्या आल्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी या विषयात लक्ष घातले व यात्रेकरूंसाठी असलेल्या शासकीय योजनेच्या कलम तीन ब-मध्ये दुरुस्ती केली आहे. यामुळे अनेक गोमंतकीयांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कोलंबोला संतपद बहाल सोहळा पाहण्यासाठी जे जातील, त्यांच्या विमान तिकिटाचा पन्नास टक्के खर्च किंवा प्रत्येकी बारा हजार रुपये खर्च सरकार करील. कोलंबोला जाऊन आल्यानंतर बिले सादर करताच सरकार खर्च देईल. कमाल पाचशे गोमंतकीयांसाठी अशा प्रकारचा खर्च सरकार करील व त्यासाठी साठ लाख रुपयांची तरतूद केली आहे. रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस हे या संतपद बहाल करण्याच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. (खास प्रतिनिधी)
कोलंबो भेटीसाठी पाचशे गोवेकरांचा खर्च करणार
By admin | Updated: December 19, 2014 03:44 IST