पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दोन्ही जिल्हा पंचायतीत युतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा मतदान संपल्यानंतर सायंकाळी उशिरा या प्रतिनिधीशी बोलताना केला. ते म्हणाले, मतदारांत बऱ्यापैकी उत्साह होता. पक्षीय पातळीवर निवडणूक घेतल्याने कार्यकर्ते कामाला लागले आणि मतदारांमध्येही उत्साह वाढला. पेडणे तालुक्यात उत्स्फूर्त मतदान झालेले आहे. काँग्रेसचा बहिष्कार हा तथाकथित होता. भयापोटी काँग्रेसने पक्षाच्या तिकिटावर उमेदवार रिंगणात उतरविले नाहीत; परंतु अपक्षांच्या मागे सर्व ताकद लावली होती. निवडणुकीपासून दूर असल्याचे काँग्रेस भासवत असली, तरी या निवडणुकीत शक्ती अजमाविण्याची संधी त्यांनी सोडलेली नाही. कोण किती पाण्यात आहे, हे शुक्रवारी स्पष्ट होईलच. भाजपचे महासचिव सतीश धोंड यांच्यावरील हल्ला, ही भ्याड कृती होती. मोटारीवर मागच्या बाजूने दगड फेकून अज्ञातांनी कारचे नुकसान केले. अशा भ्याड हल्लेखोरांच्या मागे न लागता पोलीस तक्रार न करण्याचा सल्ला आपण धोंड यांना दिला असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
दोन्ही जिल्ह्यांत स्पष्ट बहुमत
By admin | Updated: March 19, 2015 01:17 IST