पणजी : भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी शुक्रवारी केलेल्या विधानानंतर राज्यात श्रीराम सेना आणि प्रमोद मुतालिक यांच्याबाबतचा वाद नव्याने सुरू झाला आहे. तथापि, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपण राज्यात कोणत्याही संघटनेला किंवा व्यक्तीला कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही, असा इशारा शनिवारी दिला. आल्तिनो येथे शासकीय बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुतालिक यांचे नाव घेतले नाही; पण ज्या व्यक्ती व ज्या संघटना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी खेळण्याचा प्रयत्न करतील त्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कुणी जर पर्यटकांसारखे गोव्याला भेट देऊन जात असतील तर राज्य सरकारला कोणताच आक्षेप नसेल, असेही त्यांनी नमूद केले. कुणी जर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करील तर मात्र सरकार कठोर कारवाई करील. आपण कोणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. नावात काही नाही; पण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. (खास प्रतिनिधी)
प्रमोद मुतालिक यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
By admin | Updated: June 29, 2014 02:02 IST