पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी तुम्ही कर्नाटकशी बोलणी का करत नाही, अशी विचारणा करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना चर्चेचीच सूचना केली होती; परंतु पार्सेकर यांनी नम्रपणे ती सूचना नाकारली. आता या टप्प्यावर गोवा सरकार कर्नाटकशी चर्चा करू शकत नाही, असा मुद्दा पार्सेकर यांनी राजनाथसिंग यांना पटवून दिला व त्यांनीही ते मान्य केले. म्हादई पाणी तंटाप्रश्नी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा करावी, असा प्रयत्न कर्नाटक सरकार अनेक दिवस करत आहे. कर्नाटकचे सर्वपक्षीय शिष्टमंडळही दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटले होते. कर्नाटक भाजपनेही म्हादईप्रश्नी कर्नाटक सरकारने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावे, अशी मागणी केली होती; पण मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी किंवा चर्चेसाठी कुणालाच वेळ दिली नाही. राजनाथसिंग हे गेल्या आठवड्यात गोवा भेटीवर होते. त्या वेळी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी कर्नाटकमधील हिंसाचाराकडे त्यांचे लक्ष वेधले. या वेळी राजनाथसिंग यांनी तुम्ही कर्नाटकशी म्हादईप्रश्नी एकदा चर्चा का करत नाही, असा प्रश्न केला. त्या वेळी पार्सेकर यांनी हा विषय आता लवादासमोर असून लवादाचा निवाडा झाल्यानंतर मग हवे तर बोलता येईल, असे स्पष्ट केले. म्हादईप्रश्नी लवादासमोर गोव्याची बाजू भक्कम आहे. आम्हाला म्हादईप्रश्नी गोव्याचे हित पाहायचे असल्याने आता या टप्प्यावर आपण कर्नाटकशी बोलू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राजनाथसिंग यांना पटवून दिले. मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्तास दुजोरा दिला. (खास प्रतिनिधी)
म्हादईप्रश्नी केंद्राची सूचना मुख्यमंत्र्यांनी नाकारली
By admin | Updated: October 4, 2015 02:23 IST