पणजी : कंडोनेशन डिले हा गुन्हा आहे की नाही याचे स्पष्टीकरण मागणारे पत्र खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने खाण खात्याला पाठविले असले तरी अद्याप या प्रकरणात एसआयटीला कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खाण घोटाळ्यात कंडोनेशन डिलेअंतर्गत चालविलेल्या खाणींवरही शहा आयोगाने ठपका ठेवला होता. त्यामुळे या प्रकरणात तपास करण्यासाठी कंडोनेशन डिले हा गुन्हा मानून तपास करायचा की तो गुन्हा नाही असे ठरवून तपास करायचा हे एसआयटीला अद्याप सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे खाण खात्याकडे एसआयटीने या बाबतीत स्पष्टीकरण मागितले होते. खाण घोटाळा प्रकरणातील चौकशी केवळ शहा आयोगाच्या अहवालाला अनुसरून करण्यात येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर तपासाच्या दृष्टीने सरकार काय निर्णय घेते यावर तपासाची दिशा ठरणार आहे; परंतु अद्याप एसआयटीला काहीच कळविण्यात आले नसल्यामुळे आधीच संथगतीने चाललेला तपास आणखी रखडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
खाण घोटाळा तपास रखडण्याची शक्यता
By admin | Published: November 05, 2014 2:18 AM