पणजी : येथून फोंड्याच्या दिशेने निघालेली बस पानवेल-रायबंदर येथे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या घरात घुसली. या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले. जीए-०१-डब्ल्यु-४११३ क्रमांकाची ‘महानंदा’ बस भरधाव वेगात फोंड्याच्या दिशेने निघाली असता अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यालगत असलेल्या कामत यांच्या घरात घुसली. हा अपघात दुपारी ३.३० च्या सुमारास घडला. अपघातानंतर एकच हलकल्लोळ माजला. दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाल्याने कोंडी झाली. लोकांना वाहने माघारी फिरवून बायपास रस्ता धरावा लागला. चालक व एक महिला बसमध्ये अडकली होती त्यांना नंतर बाहेर काढण्यात आले. चालकाच्या पायाला जबर मार लागला असून एक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. पणजी-फोंडा मार्गावरील प्रवासी वाहतूक करणारी ही बस अपघाताआधी काही मिनिटे रायबंदर-पाटो येथे बंद पडलेल्या एका बसचे प्रवाशी घेऊन वेगात पुढे निघाली होती. पानवेल येथे एका वळणाच्या ठिकाणी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि जोरदार हेलकावे खात वेगाने ती घरात घुसली. हे घर अत्यंत जुने आहे. माहिती मिळताच तीन ‘१०८’ रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोचल्या. जुने गोवे येथील रुग्णवाहिकेतून ११, पणजीच्या रुग्णवाहिकेतून ५, तर ताळगावच्या रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला गोमेकॉत हलविण्यात आले. या भागात आधीही अनेक अपघात घडलेले आहेत. तेथे गतिरोधक घालण्याची मागणी होत आहे. बसच्या केबिनमध्ये दोघे-तिघे होते ते बाहेर फेकले गेले. (प्रतिनिधी)
रायबंदर येथे बस घरात घुसली
By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST