मडगाव : घरात घुसून दोन अज्ञात युवकांनी फ्रान्सिस्का मिरांडा (७४) यांचे हात-पाय दोरीने बांधून घरातील सुवर्णालंकार व रोकड असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. आनूस-नुवे येथ शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांशी झालेल्या झटापटीत मिरांडा यांना इजाही झाली. फ्रान्सिस्का राहात असलेला आनूस हा परिसर निर्जन आहे. तेथे केवळ पाचच घरे आहेत. बहिणी व तिच्या मुलीसमवेत या वृद्धा तेथे राहातात. शुक्रवारी सकाळी फ्रान्सिस्काची बहीण सांगे येथे तर तिची मुलगी कामानिमित्त मडगावला गेली होती. अकराच्या सुमारास दोन युवक दाराजवळ येऊन वीजपुरवठा चालू आहे का, असे विचारू लागले. फ्रान्सिस्का विजेचे बटन दाबण्यासाठी जाताना ते युवक घरात शिरले. जवळ असलेल्या कपाटाच्या दिशेने ते जाऊ लागले. या वेळी या वृद्धेने एका युवकाला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिला ढकलून दिले. सोफ्यावर पडल्याने फ्रान्सिस्का यांना दुखापत झाली. युवकाने त्यांच्या तोंडात कापडी बोळा घालून हात-पाय दोरीने बांधले. कपाटातील सोन्याचे दागिने व ५0 हजारांची रोकड लंपास केली. दागिने अंदाजे ३५ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यात दोन नेकलेस, दोन जोड्या कर्णफुले व अन्य दागिन्यांचा समावेश आहे.
वृद्धेस बांधून भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: July 5, 2014 00:48 IST