पणजी : महापालिका निवडणुकीसाठी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या पॅनलचे २१ उमेदवार जाहीर केले असून त्यात १३ नवे चेहरे आहेत. माजी नगरसेवक उदय मडकईकर व दया करापूरकर यांची पुन्हा एंट्री झाली आहे. माजी उपमहापौर यतिन पारेख यांचा प्रभाग क्रमांक १४ महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची पत्नी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी उपमहापौर कबीर पिंटो माखिजा यांच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये त्यांची बहीण सोराया पिंटो माखिजा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या विद्यमान नगरसेविका श्वेता लोटलीकर यांचे पती राहुल हे बाबूश यांच्या पॅनलमधून प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढविणार आहेत. मोन्सेरात यांनी आधी पॅनल जाहीर करण्याची परंपरा या वेळीही कायम राखली. ६0 टक्के नवे चेहरे देणार असे त्यांनी आधीच घोषित केले होते. नव्या चेहऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये (अनुसूचित जमातीसाठी राखीव) कांता शिरोडकर, प्रभाग क्रमांक ६ मध्ये शुभदा शिरगावकर, प्रभाग क्रमांक ७ मध्ये राहुल लोटलीकर, प्रभाग ८ मध्ये रेश्मा नागेश करिशेट्टी, प्रभाग क्रमांक १३ मध्ये दिनेश साळगावकर, प्रभाग १४ मध्ये लता पारेख, प्रभाग १६ मध्ये हरेश कुंकळ्येकर, प्रभाग २0 मध्ये संध्या बांदोडकर पाटील, प्रभाग २१ मध्ये हिनेश कुबल, प्रभाग २६ मध्ये लॉरेना डायस फुर्तादो, प्रभाग २८ मध्ये विठ्ठल चोपडेकर व प्रभाग २९ मध्ये वंदना शशिकांत नाईक आमोणकर यांचा समावेश आहे. प्रभाग २ मध्ये नाझारेथ काब्राल, प्रभाग ३ मध्ये मार्गारिदा कुएलो फर्नांडिस, प्रभाग ४ मध्ये दयानंद कारापूरकर, प्रभाग ५ मध्ये बेंतो लोरेना, प्रभाग १७ मध्ये पाश्कोला माश्कारेन्हस, प्रभाग १८ मध्ये उदय मडकईकर, प्रभाग १९ मध्ये कृष्णा ऊर्फ मिलिंद शिरोडकर, तर प्रभाग ३0 मध्ये विविना नास्नोडकर हे माजी नगरसेवक आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये उमेदवारी मिळालेल्या रेश्मा या माजी नगरसेवक नागेश करिशेट्टी यांच्या पत्नी होत. प्रभाग ९ आणि १0 मधून सुरेंद्र फुर्तादो दाम्पत्य निवडणूक लढविणार आहे. मोन्सेरात आपल्या पॅनलमधील उर्वरित उमेदवार पुढील एक-दोन दिवसांत जाहीर करणार आहेत. (प्रतिनिधी)
बाबूश पॅनलचे २१ उमेदवार जाहीर
By admin | Updated: February 2, 2016 03:23 IST