कारवार : जंगलात गुरे राखण्यास गेलेल्या गुराख्याला जंगली हत्तीने तुडवून ठार मारल्याची घटना मुंडगोड तालुक्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू विठू कोकरे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोनू हे पत्नीसह म्हैशी व वासरे घेऊन चरवण्यासाठी अंदलगी जंगलात गेले होते. दुपारी ३ च्या सुमारास आपल्याला घरी पाठवून पती जंगलात मागेच राहिले, असे त्याच्या पत्नीने सांगितले. सायंकाळ झाली तरी सोनू परतले नाहीत म्हणून घरच्यांनी व गावच्या लोकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते काही सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केल्यावेळी सोनू यांचा मृतदेह सापडला. सोनू यांच्या पाठीवर हत्तीने पाय दिल्याचे दिसत होते व आसपास हत्तीच्या पायांचे ठसे उठले होते. काठी, बॅटरी व त्यांच्या चप्पला इतरस्त्र पडलेल्या आढळल्या. घटनेची माहिती समजताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना माहिती दिली. ए.सी.एफ. बी. आर. रमेश, आर.एफ.ओ. विरेश कब्बीन, तहसीलदार अशोक गुराणी यांनी घटनास्थळी भेट दिली. वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २४-२५ हत्तींचा कळप कातूर-मुंडगोड भागात फिरत असून आता त्यांचे दोन कळप झाले आहेत. दरम्यान, ए.सी.एफ. रमेश यांच्या म्हणण्याप्रमाणे, पुण्याच्या वाईल्ड लाईफ रिसर्च अॅण्ड कंझर्वेशन सोसायटीतर्फे गावकऱ्यांना जंगली हत्तीपासून पिकांचे कसे संरक्षण करावे, याचे प्रशिक्षण दिले जात असे. शेतकऱ्याने एकट्या-दुकट्याने पीक रक्षणासाठी रात्री जाऊ नये. किमान तिघा-चौघांनी एकत्र असावे. बरोबर चिटबील, छोटे दगड, फटाके व टॉर्च बाळगावी. प्रसंगी हत्तींवर दगड फेकावे. फटाक्यांचा अवाज करावा, अशी सूचना दिली. घराकडे परतताना पिकाच्या गंजीच्या चारी बाजूला मिरचीची तिखट पूड पसरावी. त्या वासाला हत्ती जवळ येत नाहीत, असे ते म्हणाले. मृत सोनू यांच्या घरच्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे सर्व प्रयत्न करू, असे त्यांनी या वेळी आश्वासन दिले. गेल्या आठ-दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. कातूर ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील नंदीपूर येथे १८ डिसेंबरला हनुमंत वड्डर या शेतकऱ्याचा हत्तींनी बळी घेतला होता. जंगली हत्तींपासून आपले व पिकाचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
हत्तीच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार
By admin | Updated: December 26, 2014 02:09 IST