पणजी : मडगावचे माजी नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या भाजप प्रवेशाचा आणि लुईस बर्जर कंपनीच्या कथित जैका लाच प्रकरणाचा काहीच संबंध नाही. आपल्याला सरकाकडून वशिलाही नको आहे, असे डिसिल्वा म्हणाले. डिसिल्वा यांच्या पक्ष प्रवेशाचा छोटेखानी कार्यक्रम भाजपच्या येथील कार्यालयात झाला. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आणि दामू नाईक उपस्थित होते. डिसिल्वा हे आपल्या समर्र्थकांसह भाजपमध्ये आले आहेत. मोती डोंगर हा दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, त्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडून त्या भागातून डिसिल्वा हे निवडून येऊन मडगावचे नगरसेवक बनले. डिसिल्वा यांनी तीन महिन्यांपूर्वी भाजपशी संपर्क साधून भाजपचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही आता डिसिल्वा यांच्याकडून पक्ष प्रवेशाचा अर्ज भरून घेतल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत डिसिल्वा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला तिकीट द्यावे, अशी अट पक्षाला घातलेली नाही. भाजप सरकारचे काम आपल्याला आवडले, म्हणून भाजपमध्ये आलो आहे. लुईस बर्जर लाचप्रकरणी माझा काहीही संबंध नाही. न्यायालयाने त्यामुळेच मला जामीनही दिला. दिगंबर कामत यांनी माहिती हक्क कायद्याखाली एक अर्ज केला होता. जैकाच्या कार्यालयात जाऊन मी त्या अर्जाशी संबंधित उत्तर तेवढे कामत यांना आणून दिले. (खास प्रतिनिधी)
आर्थूर डिसिल्वा यांचा भाजपमध्ये प्रवेश
By admin | Updated: April 15, 2016 02:06 IST